गरोदर मातांनी विशेष काळजी घ्यावी : म्हवाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:16+5:302021-08-27T04:15:16+5:30
नीरेत गरोदर मातांना मच्छरदाणी व गुडक्नाईट वाटप. नीरा : एडिस इजिप्तू जातीचे डास चावल्याने जसा डेंग्यू किंवा चिकुणगुनिया होतो, ...
नीरेत गरोदर मातांना मच्छरदाणी व गुडक्नाईट वाटप.
नीरा : एडिस इजिप्तू जातीचे डास चावल्याने जसा डेंग्यू किंवा चिकुणगुनिया होतो, तसाच तो गरोदर मातेला चावला तर गर्भातील बाळाला धोका पोहोचून बाळाला झिकाची लागण होऊ शकते. जन्माला येणारे बाळ मतिमंद किंवा दिव्यांग होऊ शकते. यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या परिसरात डास होणारच नाहीत याची काळजी घेऊन गरोदर मातांनी विशेष काळजी घ्यावी, असे मत डॉ. अक्षय म्हवाण यांनी व्यक्त केले.
नीरा (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गरोदर मातांना झिका रोगाबाबत घ्यावयाच्या काळजी यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी १०४ गरोदर मातांना मच्छरदाणी व गुडनाईट यंत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय म्हवाण व आरोग्य सहायक बाप्पूसाहेब भंडलकर यांनी गरोदर मातांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच तेजश्री काकडे होत्या, उपसरपंच राजेश काकडे, सदस्या वैशाली काळे, राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, वर्षा जावळे, संदीप धायगुडे, अनंता तांबे, अभिजित भालेराव, विजय शिंदे उपस्थित होते.
नीरा शहरात यापूर्वी डेंग्यू चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. या वर्षी परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पुरंदरच्या आरोग्य विभागाने उपाययोजना व जनजागृती करायला सुरुवात केली आहे. आशा स्वयंसेविका घरोघरी सर्वेक्षण करत आहेत. त्यांना योग्य माहिती द्यावी व सर्वेक्षणाला सहकार्य करावे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने धूरफवारणी करण्यात येत आहे. त्या वेळी प्रत्येकाने आपल्या घरात धूरफवारणी करुन घ्यावी, असे आव्हान सरपंच तेजश्री काकडे यांनी केले.
२६ नीरा
नीरा येथील गरोदर मातांना मच्छरदाणी व गुडनाईट यंत्राचे वाटप करण्यात आले.