फलोदे येथील गर्भवतीला मृत्यूनंतरही न्याय मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:25+5:302021-02-17T04:15:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील गर्भवती महिला व बाळाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दि.११ जानेवारी रोजी पीडित कुटुंबाच्या घरी येवून चौकशी केली होती. तसेच या घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यातही आला. मात्र, याला महिना उलटूनही दोषींवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील फलोदे या गावातील पूनम दत्तात्रय लव्हाळे या २२ वर्षीय गर्भवती महिलेला वेळेत आरोेग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या नंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शल्यचिकित्सक शोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने फलोदे येथील गर्भवती महिलेच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथील खासगी डाॅक्टर तसेच पिपंरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावून समितीने चौकशी केली होती. याचा तपास पूर्ण करून १५ जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादरही केला आहे, अशी माहिती समितीतील एक अधिकारी आर. बी. पंडुरे आहे. मात्र, एक महिनाही उलटला तरी पण अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.