गरोदर महिलांनाही घेता येणार लस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:45+5:302021-07-07T04:11:45+5:30

पुणे : केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार आता स्तनदा माता आणि गर्भवती महिलांनाही लस घेता येणार आहे. कोरोनाची लागण झाल्यास ...

Pregnant women can also be vaccinated! | गरोदर महिलांनाही घेता येणार लस!

गरोदर महिलांनाही घेता येणार लस!

Next

पुणे : केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार आता स्तनदा माता आणि गर्भवती महिलांनाही लस घेता येणार आहे. कोरोनाची लागण झाल्यास गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्भवती महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण अवश्य करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याने आरोग्य मंत्रालयाने त्यांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच गर्भधारणेचे नियोजन करत असलेल्या महिलाही लसीकरण करून घेऊ शकतात. विशेषतः ३५ पेक्षा अधिक वयाच्या गर्भवती महिला, स्थूलता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असलेल्या गर्भवतींनी जरूर लस घ्यावी, असे आवाहन स्त्रीरोगतज्ञांनी केले आहे.

सध्या जिल्ह्यात ४१९ लसीकरण केंद्रे आहेत. सर्व सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र सोय असावी, लसीकरणासाठी त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. गर्भवती महिला कोणत्याही तिमाहीमध्ये लसीकरण करून घेऊ शकतात. अर्भकावर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली तरी ती अतिशय सौम्य स्वरूपाची असते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

चौकट

आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ४८,४२,५६२

पुरुष - २६,६९,२०९

महिला - २१,७२,६७५

चौकट

“गर्भावस्थेत कोरोना झाल्यास गुंतागुंत वाढू शकते. गर्भावस्थेत रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात कोरोना झाल्यास काही वेळा गर्भपातही होऊ शकतो. वेळेआधी प्रसूती झाल्याची काही उदाहरणे आहेत. कोरोनामुळे पोटातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना लसीकरण सुरू करावे, अशी मागणी आमच्या ऑल इंडिया फेडरेशनने केली होती. ती सरकारने मान्य केली. ज्या गर्भवती महिलांमध्ये स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्त गोठण्याची समस्या असेल तर त्यांनी लसीकरण करून घेतले पाहिजे. काही गर्भवती महिलांना सौम्य तर काहींना तीव्र कोरोना संसर्ग झाला. तीव्रता टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. सर्व गर्भवतींना आम्ही लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत आहोत. लसीकरणानंतर एक-दोन दिवस थोडा ताप येणे, अंगदुखी असा त्रास होऊ शकतो. मात्र, लसीचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळलेले नाहीत.”

- डॉ. सुनीता तांदूळवाडकर, अध्यक्षा, द फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया, पुणे शाखा

Web Title: Pregnant women can also be vaccinated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.