आठव्या महिन्याच्या गर्भवतीने केला ' रायगड ' सर !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 07:18 PM2019-09-11T19:18:06+5:302019-09-11T19:19:08+5:30
आजच्या धकाधकीच्या काळात गरोदरपणा व संबंधीच्या अनेक तक्रारींना महिलावर्गाला सामोरे जावे लागते...
राजगुरूनगर : इतिहासाच्या पानात अढळस्थानी असणाऱ्या राजमाता जिजाऊ, महाराणी येसुबाई, हिरकणी यासारख्या कर्तबगार महिलांकडून मिळत असलेली ऊर्जा आणि गिरिभ्रमणाचे लागलेले वेड, याचे पडसाद गर्भवती महिलेला डोहाळ्यातही प्रतिबिंबित झाले.
येथील रहिवासी स्वप्निता स्वप्नील पडवळ प्राध्यापक आहे. आठव्या महिन्याची ती गर्भवती युवती लागलेल्या डोहाळ्यानी आणि तिच्यातील ऊर्जा आणि इतिहास प्रेमाने तिला स्वस्थ बसू दिलेनाही. स्वराज्याची राजधानी असणारा बेलाग रायगड तिने चढून सर केला.
आजच्या धकाधकीच्या काळात गरोदरपणा व संबंधीच्या अनेक तक्रारींना महिलावर्गाला सामोरे जावे लागते. अशातच महिलांमध्ये गरोदरपणात विशेष काळजी घेतली जाते. या काळात साहसी कृत्य व श्रमाच्या कामांचा विचार दूरदूरपर्यंत मनात येत नाही, परंतु या प्रस्थापित विचारसरणीला छेद देत स्वप्निता पडवळ या तरुणीने आठव्या महिन्यातील गर्भासह बेलाग किल्ला रायगड पायथ्यापासून पायी सर केला.
........
स्वप्निताला रात्री ९च्या सुमारास जेवताना रायगडावर जाण्याची इच्छा निर्माण झाली. स्वप्नीता हिने नवऱ्याला ही इच्छा सांगितली. रात्री ११ वाजता लगोलग ते बेलाग रायगडाकडे निघालेही. पहाटे साडेपाच वाजता पायथ्याशी पोहचून त्यांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. गर्भार अवस्थेतील ते पोट व अवघडलेली अवस्था असतानाही स्वप्नीता रायगड चढून गेली. रायगडावर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन व जगदीश्वराचे दर्शन घेऊन स्वप्नीता गड उतरली ती आगळे वेगळे लागलेले डोहाळे पूर्ण करून.