अखेर ठरलं...! MPSC ची पूर्व परीक्षा होणार २३ जोनवारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:15 PM2022-01-03T17:15:53+5:302022-01-03T17:18:29+5:30
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपरच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
पुणे : कोराेना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीकरीता जाहिराती दोन वर्षात प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने २८ डिसेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. त्यानुसार आता सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपरच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J1dQq6qWRV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 3, 2022
सुधारित परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
१) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक ०२ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक २३ जानेवारी २०२२.
२) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक २२ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक २९ जानेवारी २०२२.
३) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक २९ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक ३० जानेवारी २०२२.