पूर्ववैमनस्यातून गुन्हेगारावर गोळीबार
By admin | Published: March 31, 2017 03:26 AM2017-03-31T03:26:01+5:302017-03-31T03:26:01+5:30
पूर्ववैमनस्यातून तरुणावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास
पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एरंडवण्यातील भरत क्रीडा संकुलजवळ घडली. या घटनेत तरुणाच्या पोटामध्ये गोळी लागली असून तो सराईत गुन्हेगार आहे. गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या परिसरातील नागरिकांनी दहशतीमुळे दुकाने बंद केली. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाबूलाल लक्ष्मण मोहोळ (रा. ओटा वसाहत, गणेशनगर, एरंडवणा), सचिन ऊर्फ बाळा विठ्ठल सोनवणे (रा. वारजे) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल अंकुश गिरी (वय २६, रा. ओटा वसाहत, गणेशनगर, एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
पूर्वीच्या भांडणाच्या रागामधून बाबूलालने २ दिवसांपूर्वी निखिलला फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने अलंकार पुलाजवळील देवीच्या मंदिराजवळ बाबूलाल व सोनवणे यांनी पुन्हा वादावादी घालत धमकी दिली. गुरुवारी न्यायालयात जायचे असल्याने निखिल तयार होऊन भरतकुंज क्रीडा संकुलासमोर जाऊन मित्र सचिन जाधव याची वाट पहात उभा होता. संकुलाच्या गेटसमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीवर तो बसलेला असताना पाठीमागून आलेल्या सोनवणे याने गोळी झाडली. ही गोळी निखिलच्या पोटात लागली. गोळीबाराचा आवाज ऐकताच आसपासच्या दुकानदारांनी दुकाने बंद
केली. सर्वांनी तेथून पळ काढला.
निखिल याने मुख्य रस्त्यावर जाऊन एका दुचाकी चालकाला रुग्णालयात सोडायची विनंती केली. दिनानाथ रुग्णालयात जाऊन तो उपचारांसाठी दाखल झाला. रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस रुग्णालयात धावले.