वेगाची नशा घेतेय अकाली बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:52 AM2017-08-07T03:52:48+5:302017-08-07T03:52:48+5:30
लक्ष्मण मोरे
पुणे : अत्याधुनिक इंजिन आणि प्रचंड वेगासाठी तयार करण्यात आलेल्या दुचाकींमुळे तरुणांमध्ये वेगाची नशा वाढत आहे. हीच वेगाची नशा स्वत:सह इतरांच्याही जिवावर उठली आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला असून गेल्या तीन वर्षांत जवळपास ६५० दुचाकीस्वारांना रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहेत.
आधुनिक ‘मेक’च्या दुचाकी वापरण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. सुसाट आणि वेडीवाकडे वळणे घेत जाणाºया दुचाकी रस्त्यांवर पाहून भीती वाटते. रस्त्यावरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यावर वर्दळ असते. परंतु बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जातात. वेडीवाकडी वळणे घेत, मैत्रिणींना खूष करण्यासाठी दुचाकी भरधाव चालवल्यामुळे अपघात घडतात. वाहतूक पोलिसांकडून अशा दुचाकींवर कारवाई केली जाते; परंतु वाहनाचा वेग मोजणाºया ‘स्पीड गन’ वाहतूक पोलिसांकडे कमी असल्यामुळे या कारवायांमध्ये मर्यादा येतात. प्रचंड गर्दी असूनही त्या गर्दीमधून ‘गॅप’ काढत जाणारे तरुण, मोबाइल कानाला लावून दुचाकीवर बोलणारे, महामार्गांवर अवजड वाहनांना खेटून घेतली जाणारी वळणे, त्यांना ‘कट’ मारणे अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. विशेषत: वळणांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर किंवा पदपथाला धडकल्यानेही अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. अनेकदा दारू पिऊन दुचाकी चालवल्यामुळे, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
शहरातील रस्त्यांवर महिन्याकाठी शेकडो अपघात होत आहेत. अपघात घडविणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे सुशिक्षितांचे आहे. बेफाम सोडलेला अॅक्सिलेटर, वेगाची प्रचंड नशा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यांमुळे पुण्यातील रस्त्यांवर शेकडो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या सहा महिन्यांत गंभीर स्वरूपाच्या १७८ अपघातांमध्ये १८३ निष्पापांचे बळी गेले आहेत.
उरात धडकी भरविणारा वाहनांचा वेग अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे. अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल. ‘मानवी जीवन अमूल्य आहे आणि ते जपायला हवे,’ असे नेहमी सांगण्यात येते; परंतु वाहनचालकांमधील बेदरकार वृत्ती आणि वेगाची नशा या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. पुणेकर वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली. पुणेकर वाहनचालकांचे आणि शिस्तीचे एकमेकांशी दुरदुरूनही नाते नाही की काय, अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे. धोकादायक अवस्थेत ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वाहनात मर्यादेपेक्षा अधिक माणसांचा, सामानाचा भरणा करणे (ओव्हरलोडिंग), वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान यांमुळे रस्त्यांवरील अपघांची संख्या वाढत चालली आहे.
या गोष्टी करा
लेनची शिस्त पाळा
वेगमर्यादेचे पालन करा
अपघातग्रस्तांना मदत करा
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे
चारचाकी चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा
वाहनाच्या हेडलाईट, टेल लॅम्प,
पार्किंग लाईट तपासा
सर्व वाहतूक नियमांचे
पालन करा
वेगमर्यादेचे
उल्लंघन करणे
वाहनांमध्ये
स्पर्धा करणे
मर्यादेपेक्षा अधिक माणसे अथवा
सामान भरणे
या गोष्टी टाळा
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे
दारू पिऊन वाहन चालविणे
धोकादायक अवस्थेत ओव्हरटेकिंग करणे
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणे
बेकायदा व अशास्त्रीय पार्किंगही जबाबदार
अनेकदा अरुंद रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणीही वाहनांचे वेडेवाकडे पार्किंग होते. अनेक हॉटेल आणि मॉल व मोठ्या दुकानांसमोर बेकायदा पार्किंग असते. त्यातून मार्ग काढणाºया छोट्या वाहनांना जड वाहनांच्या धडकेमुळेही रस्त्यांवर अपघात होत आहेत.
अनेक इमारतींमधील पार्किंग व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात आहे. पर्यायाने इमारतीसमोरच वाहने लागायला सुरुवात होते. अशा व्यावसायिकांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत नाही.
सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे,
नो एंट्रीत वाहने चालविणे,
हेल्मेट व सीट बेल्टचा वापर
न करणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.