प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे स्टेशन येथून 'प्रीपेड रिक्षा सेवा' सुरू; रात्रीच्या प्रवाशांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:50 AM2024-06-19T09:50:10+5:302024-06-19T09:50:29+5:30
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या रहिवाशांच्या सुविधेसाठी तसेच रात्री-अपरात्री येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना ...
पुणे :पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या रहिवाशांच्या सुविधेसाठी तसेच रात्री-अपरात्री येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा व सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने प्रीपेड ऑटो रिक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरात प्रीपेड थांबा ही संकल्पना राबविण्यात आली होती ती काही कारणास्तव बंद होती. ती आता नव्याने सुरू करण्यात येत आहे.
याबाबत मंगळवारी (दि. १८) प्रीपेड ऑटो रिक्षा थांबा योजना राबविण्याबाबत रिक्षा प्रवासी सेवा संस्था, पुणे यांची बैठक पार पडली. यामध्ये पुणे शहरामध्ये पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू असलेली प्रीपेड ऑटोरिक्षा थांबा ही योजना पूर्ववत करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार पुणे स्टेशन प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ प्रायव्हेट तत्त्वावर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केेले आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे सदर प्रीपेड योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास उत्सुक असणाऱ्या संघटना, संस्था किंवा कंपनी यांनी अपील अर्ज (दि. २६) जूनपर्यंत सादर करावेत, असे आवाहन पोलिस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.