स्वबळावर लढण्याची तयारी
By admin | Published: October 6, 2016 03:19 AM2016-10-06T03:19:47+5:302016-10-06T03:19:47+5:30
मावळ तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. चांदखेडआणि कुसगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित
वडगाव मावळ : मावळ तालुका पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. चांदखेडआणि कुसगाव गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे.
गण आरक्षण सोडत येथील महसूल भवन सभागृहांमध्ये झाली. दहा पंचायत समिती मतदारसंघातून महिलांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर उर्वरित अन्य गणांची आरक्षणे जाहीर करण्यात आली. मतदारसंघ आरक्षण सोडतप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी सुनील थोरवे व तहसीलदार योगेंद्र कट्यारे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, सतीश धस यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. तालुक्यातील टाकवे, वडेश्वर, इंदोरी, सोमाटणे, वडगाव, खडकाळा, कुसगाव, वाकसई , महागाव आणि चांदखेड हे मतदारसंघ असून, आगामी पंचायत समिती निवडणुकींतील उमेदवारांचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले.
टाकवे, वडेश्वर, सोमाटणे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले राहिले आहेत. कुसगाव आणि चांदखेड गणात सर्वसाधारण महिलांना निवडणूक लढविता येणार आहे. इंदोरी गण अनुसूचित जाती महिला, वडगाव गण इतर मागासवर्ग सर्वसाधारण , खडकाळा व महागाव गण इतर मागासवर्ग महिला, वाकसई गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण अशी सोडत जाहीर करण्यात आली. (वार्ताहर)
इच्छुकांनी काढले कुणबीचे दाखले
भाजपा आणि आगामी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे उमेदवारही रिंगणात असल्याने व निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्यामुळे मतदारसंघातील वर्चस्वाचा अंदाज लावणे अश्यक्य आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत मावळात नवीन राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात. सर्वसाधारणसाठी जागा खुली न राहिल्यास खबरदारी म्हणून काही इच्छुक उमेदवारांनी ओबीसीचे दाखले काढून ठेवले आहेत.