तयारी गणेशोत्सवाची : खरेदीसाठी ग्रामस्थांची लगबग, सासवडला गणेशमूर्तीवर अखेरचा हात....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:03 AM2017-08-21T03:03:44+5:302017-08-21T03:04:05+5:30
महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्तीदेखील विक्रीस ठेवल्याचे येथील पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे हरिदास कुंभार यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती
आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्तीदेखील विक्रीस ठेवल्याचे येथील पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे हरिदास कुंभार यांनी सांगितले.
जीएसटीचा गणेशमूर्तींच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. बाजारात स्पर्धेला तोंड देण्यासाठी नवीन प्रयोग म्हणून आकर्षक कलाकुसर केलेल्या हारांच्या गणेशमूर्तींची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले.
चार महिन्यांपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात केली असून, या वर्षी अंदाजे आठशेहून अधिक मूर्ती बनविल्याचे कुंभार यांनी सांगितले. नऊ इंचापासून साडेपाच फूट उंचीच्या मूर्ती बनविण्यात आल्या असून, त्या बाजारात साडेतीनशे रुपयांपासून बारा हजारांपर्यंत विकल्या जाणार आहेत. पेन गन, कप गन, ब्रश, चमक, वेलवेट, नैसर्गिक व फ्लोरोसंट रंग, लेस, खडे आदींचा वापर करून आमची ही तिसरी पिढी मूर्ती बनवीत असल्याचे हरिदास, प्रताप, राजेंद्र आणि पोपट या कुंभार बंधूंनी सांगितले.
लोकांच्या मागणीनुसार तसेच कालपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्तींची मागणी वाढत असून लालबागचा राजा, दगडूशेठ, बाहुबली रूपातील तसेच मोरावर आरूढ झालेला गणेश आदी स्वरूपाच्या मूर्ती बनविण्यात आल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.
मूर्ती ठेवण्यासाठी जागा मिळावी
सासवडमध्ये सर्व मिळून अंदाजे पंधरा हजार मूर्ती विक्रीसाठी येत असतात. गणपतीमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्य विकणारेही असतात. यानिमित्ताने, गणेशमूर्ती बनविण्यासाठी आणि त्या सुरक्षित ठेवण्यासाठी पुण्याच्या केशवनगरसारखी पर्यायी जागा सासवडमध्ये नगरपालिकेने भविष्यात उपलब्ध करून द्यावी आणि या परंपरागत कुंभार व्यवसायाला ताकद द्यावी, अशी अपेक्षा कुंभारबंधूंनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.