जम्बोमधील तयारी पूर्ण, मंगळवारपासून रुग्ण घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:11 AM2021-03-21T04:11:02+5:302021-03-21T04:11:02+5:30
दोन रुग्णवाहिका तैनात : पालिकेचे सुरक्षा रक्षक राहणार तैनात पुणे : वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवार किंवा मंगळवारपासून शिवाजीनगरचे ...
दोन रुग्णवाहिका तैनात : पालिकेचे सुरक्षा रक्षक राहणार तैनात
पुणे : वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवार किंवा मंगळवारपासून शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन, आयसीयू आणि अलगिकरण अशा २५० खाटा सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता खबरदारी बाळगण्यात येणार आहे.
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रूग्णांची संख्या कमी आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. नागरिकांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता जम्बो रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जशी गंभीर परिस्थती निर्माण झाली होती, तशी स्थिती पुन्हा उद्भवू नये करिता प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.
शहरात आजमितीस सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या अधिक असून ६५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण गृहविलगिकरणात राहून उपचार घेत आहेत. गंभीर रूग्णांची संख्या वाढू लागल्यास त्यांच्यावर उपचारांसाठी पालिकेकडून व्यवस्था करून ठेवण्यात येत आहे. जम्बो सोबतच आणखी चार कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्बो रुग्णालय सोमवारपासून सुरू केले जाणार असले तरी प्रत्यक्षात रुग्ण घेण्यास मंगळावरपासून सुरुवात होणार आहे. येथील वैद्यकीय व्यवस्थेचे कामकाज मेडिब्रोस या एजन्सीकडून केले जाणार आहे. याठिकाणी एक कार्डिअक आणि साधी अशा दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.
-------
जम्बो रुग्णालयातील सुरू केल्या जाणाऱ्या खाटांचा तपशील
ऑक्सिजन बेड - १२५
अलगिकरण - १००
आयसीयू - २५