‘त्या’ अर्भकाचे पालकत्व घेण्याची अनेकांची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 11:56 PM2018-12-16T23:56:55+5:302018-12-16T23:57:01+5:30
‘फेकून दिलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांच्या मायेची ऊब’ हे वृत्त शनिवारी (दि. १५) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले.
बारामती : तालुक्यातील माळेगाव कॉलनी येथे वडापावच्या गाड्यावर बेवारस अवस्थेत सोडुन दिलेल्या अर्भकाच्या संगोपनाची तयारी बारामती शहरातील अनेकांनी दर्शविली आहे. जन्मदात्यांनी सोडून दिलेल्या अर्भकाचे पालकत्व, मातृत्व स्वीकारून कुशीत घेण्यासाठी महिलांचे हात पुढे आले आहेत.
‘फेकून दिलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांच्या मायेची ऊब’ हे वृत्त शनिवारी (दि. १५) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त वाचल्यानंतर शहरातील नागरिक हळहळले. अनेक दांपत्यांनी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याशी संपर्क साधून त्या अर्भकाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच अनेकांनी नवजात अर्भक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावर पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी बाळाला दत्तक देण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडे नाही. बाळाला दत्तक घेण्यासाठी ‘चाईल्ड वेल्फेअर कमिटी’कडे संपर्क साधावा, असे सूचित केले. तसेच शहरातील एका नामांकित कापड दुकानात काम करणाऱ्या निपुत्रिक महिलेनेदेखील ‘आम्हाला मूलबाळ नाही, त्या बाळाला दत्तक घेऊन आई-वडीलांच्या मायेची ऊब देण्याची तयारी दर्शविल्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले.
शहर पोलिसांनी हुडहुडी भरविणाºया थंडीत वडापावच्या गाड्यावर नवजात अर्भकाला सोडून देणाºया अज्ञात मातापित्यांचा शोध सुरू केला आहे. त्या अर्भकाच्या अंगावरील मलमल कापड, लोकरीचा स्वेटर, कानटोपी, ‘लव्ह’ लिहिलेले लोकरसदृश कापड आदींचे छायाचित्र काढले आहे. त्याद्वारे हे कपडे खरेदी केलेल्या कापड दुकानासह, दुकानातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून त्या मातापित्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी बारामतीसह आसपासच्या भागात शनिवारपासून शोधमोहीम सुरू केल्याचेदेखील धुमाळ यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांचे बारामती पोलिसांना ५ हजारांचे बक्षीस
नवजात अर्भकाला सापडल्यापासून त्याला केडगाव (ता. दौंड) येथील शिशु संगोपन केंद्रात पोहोच करेपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोसले, महिला पोलीस रेखा सोनवणे आदींनी कर्तव्यनिष्ठेपलीकडे जाऊन भूमिका बजावली. पोलिसांनी दिलेल्या मायेमुळे नवजात अर्भकाला नवीन जीवन मिळाले. त्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलिसांचे कौतुक करीत ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
नवजात अर्भक सापडल्यानंतर तत्परता दाखवून त्याला मायेची ऊब देऊन जीवदान देणाºया बारामती पोलिसांवर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे.
वडापावच्या गाड्यावर उघड्यावर फेकून दिलेल्या बाळापर्यंत पोलिसांच्या अगोदर परिसरातील भटकी कुत्री पोहोचली असती तर, या कल्पनेनेच अनेकांच्या अंगावर शहारे आले.
पोलिसांना माहिती देणारे नगरसेविका रुपाली गायकवाड यांचे पती दीपक हे पोलीस येईपर्यंत थांबून होते. जन्मदात्यांनी फे कून दिले तरी अनोळखी, रक्ताचे नाते नसणाºयांनीच या अर्भकाला जीवदान दिले. त्यामुळे पोलिसांसह यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºयांवर कौतुकाचा वर्षाव सुरूच होता.