राज्यातील चार साखर कारखान्यांची ऑक्सिजन निर्मितीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:47+5:302021-04-27T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यातील ४ साखर कारखान्यांनी त्यांच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पात आवश्यक ते बदल करून त्वरित ऑक्सिजन निर्मितीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यातील ४ साखर कारखान्यांनी त्यांच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पात आवश्यक ते बदल करून त्वरित ऑक्सिजन निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना मांजरीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तांत्रिक साह्य करत आहे.
पांडुरंग सहकारी-पंढरपूर, जवाहर- इचलकरंजी, सह्याद्री- कराड या कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीची तयारी दर्शवली आहे.उस्मानाबाद येधील धाराशिव साखर कारखाना खासगी आहे. त्यांचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प येत्या ८ ते १० दिवसांत सुरू होईल. त्यातून रोज १६ ते २० टन ऑक्सिजन मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तांत्रिक साह्य केले आहे. त्याच्या यशस्वितेनंतर अन्य सहकारी कारखान्यांमध्येही हा प्रयोग करण्यात येणार आहे. मात्र, त्यात इथेनॉलचे उत्पादनाबाबत कारखाना व ऑईल कंपन्या यांच्यात झालेल्या कराराची अडचण असल्याने त्याला वेळ लागणार आहे असे समजते.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ अल्कोहोल टेक्नॉलॉजी अँड बायोफ्युएलचे प्रमुख डॉ. संजय पाटील म्हणाले, यासाठी कारखान्यांच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पात काही बदल करावे लागतात. काही यंत्रसामग्री लागते. त्यातील काही सामग्री परदेशातून मागवावी लागणार आहे. या सर्वांचा खर्च साधारण ७० लाख ते मोठा प्रकल्प असेल तर १ कोटीपर्यंत आहे
धाराशिव कारखाना खासगी आहे, त्यांचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प होता, पण त्यांचे इथेनॉल उत्पादनाचे करार झालेले नव्हते. त्यामुळे तिथे लगेचच ही यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य झाले. येत्या ८ ते १० दिवसांतच धाराशिवमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात होईल, अशी खात्री डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.