डेमूच्या फेऱ्या वाढविण्याची तयारी सुरू
By admin | Published: March 31, 2017 11:39 PM2017-03-31T23:39:42+5:302017-03-31T23:39:42+5:30
पुणे-दौंड मार्गावर अनेक वर्षांपासून मागणी असलेली लोकल सेवा डेमूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) रूपाने सुरू करण्यात आली
पुणे-दौंड मार्गावर अनेक वर्षांपासून मागणी असलेली लोकल सेवा डेमूच्या (डिझेल मल्टिपल युनिट) रूपाने सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वेळा आणि फेऱ्यांच्या संख्येवरून प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून, फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार वेळापत्रकात बदल केले जातील. त्यासाठी अभ्यास सुरू करण्यात आला आहे. ‘डेमू’ गाड्यांची देखभाल दुरूस्ती तसेच या मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याची पडताळणी सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक (वाणिज्य) कृष्णाथ पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, सध्या डेमूच्या एकूण चार फेऱ्या होत आहेत. पुण्यातून दोन आणि दौंड येथून दोन गाड्या सोडल्या जात आहेत. तर बारामतीसाठी एक फेरी होत आहे. पुणे स्थानकात सायंकाळी येणारी कर्जत शटल पुणे स्थानकात थांबवून तिथून डेमू सोडण्यात येत आहे. या शटलमधील प्रवाशांना पुढे जाण्यासाठी गाडी बदलावी लागणार आहे. मात्र, त्यामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होईल. गाडीत गर्दी होणार नाही. ही डेमू बारामतीमधून रात्री मुक्कामी दौंडपर्यंत येईल. ही डेमू सकाळी दौंडवरून पुण्याकडे सुटेल. त्यामुळे या फेरीसह एकूण पाच फेऱ्या होत आहेत.
प्रवाशांकडून डेमूच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. तसेच फेऱ्या वाढविण्याचीही मागणी करण्यात येत आहे. फेऱ्या वाढविणे किंवा वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय पुणे विभागात घेतला जात नाही. या निर्णयाला मुख्यालयातून मान्यता मिळावी लागते. सध्या पुणे विभागाकडे दोन गाड्या उपलब्ध आहेत. आणखी गाड्या मिळण्याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र, उपलब्ध गाड्यांचे नियोजन करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरुवात करण्यात आलेली ‘डेमू’ या गाडीला डिझेलवर चालणारे इंजिन आहे. तर पुणे-दौंड मार्गावर सुरू असलेली लोकलला (इमू) इलेक्ट्रिक इंजिन आहे. दोन्ही गाड्यांचा विचार केल्यास डेमूची काही वेगळी वैशिष्ट्य आहेत. दहा डब्यांच्या एका गाडीमध्ये साधारपणे ७४० प्रवासी बसून प्रवास करू शकतात. तर अकराशेहून अधिक प्रवासी सहजरीत्या उभे राहू शकतात.
सध्या धावत असलेल्या डेमू या पंधरा डब्यांच्या आहेत. पुण्यात आलेल्या दहा-दहा डब्यांच्या तीन डेमूंचे रूपांतर दोन डेमूमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे एका डेमूला चौदा डबे जोडणे शक्य झाले. परिणामी एकावेळी दोन हजार आठशेहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
डेमूमध्ये दोन बायो टॉयलेटची सोय आहे. प्रत्येक डब्यामध्ये स्थानक दर्शविणारा डिजिटल फलक असल्याने स्थानक जवळ आल्याची माहिती प्रवाशांना मिळू शकते. तसेच सर्व डबे एकमेकांशी जोडले गेले असल्याने कोणत्याही डब्यातून इतर डब्यांमध्ये जाणे शक्य होते. चढण्या-उतरण्यासाठी प्रत्येक डब्याला पायऱ्यांची सोय आहे. त्यामुळे फलाटाची आवश्यकता भासणार नाही. या सर्व सुविधा पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलमध्ये नाहीत. त्यामुळे डेमूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत. तळेगाव ते दौंड या मार्गावर सध्या दररोज सुमारे ७० हजार प्रवासी रेल्वने प्रवास करतात. पुणे ते दौंड दरम्यान आठ तर दौंड बारामतीदरम्यान चार पॅसेंजर गाड्या आहेत. डेमूमुळेही आता प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पॅसेंजरमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे काही प्रवाशांना इतर गाड्यांनी प्रवास करावा लागतो. अनेक प्रवासी रेल्वेशिवाय इतर पर्यायी वाहनांचा आधार घेत आहेत. या प्रवाशांनाही आता दिलासा मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासी संख्येत निश्चितपणे वाढ होईल. नवीन प्रवाशीही डेमूशी जोडले जातील.
पुणे-दौंड मार्गावर लोकल सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडथळे आहेत. खुटबाव, कडेठाण आणि मांजरी स्थानकाच्या फलाटाचे काम करण्यास रेल्वे मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. हे काम झाल्यानंतर तसेच काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर लोकल सुरू करता येऊ शकेल. या बाबींची पूर्तता होईपर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी ‘डेमू’ची सेवा नियमितपणे सुरू राहील.