आमदार हेमंत रासने 'इन अॅक्शन मोड'वर ; 'कचरामुक्त कसब्यासाठी पंधरा दिवसात आराखडा तयार करा'
By राजू हिंगे | Published: November 27, 2024 06:23 PM2024-11-27T18:23:45+5:302024-11-27T18:25:27+5:30
हेमंत रासने यांची पालिका प्रशासनाला सूचना
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ कचरामुक्त करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात नियोजन आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार हेमंत रासने यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. कचरामुक्त कसब्याचा निर्धार करत आमदार हेमंत रासने यांनी कामाला सुरूवात केली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत रासने यांनी सकाळी ७ वाजता संपूर्ण मतदारसंघात पाहणी केली.
यावेळी अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी., घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम, कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दूध भट्टी, गणेश पेठ, ताडीगुत्ता, गंज पेठ रोड तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला या ठिकाणांची पाहणी केली.
हेमंत रासने म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक लढत असताना मतदारसंघातील नागरिकांना आपण विकासाचा पंचसूत्री उपक्रम राबविणार असल्याचा शब्द दिला आहे. यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कसबा घडवण्यासाठी विशेष आराखडा तयार करून कार्यवाही केली जाणार असून, पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली. कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा असून, जगभरातून नागरिक येथे भेट देतात. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ कचरामुक्त करण्याचा संकल्प आहे.