बीजसोहळ्यासाठी सज्ज
By admin | Published: March 25, 2016 03:43 AM2016-03-25T03:43:57+5:302016-03-25T03:43:57+5:30
दुष्काळाची पार्श्वभूमी आणि कडक उन्हाळा असूनही राज्याच्या कानाकोपऱ्यांतील हजारो भाविक शुक्रवारी (दि. २५) होणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या बीजोत्सव सोहळ्यासाठी
देहूगाव : दुष्काळाची पार्श्वभूमी आणि कडक उन्हाळा असूनही राज्याच्या कानाकोपऱ्यांतील हजारो भाविक शुक्रवारी (दि. २५) होणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या बीजोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत आहेत. ठिकठिकाणी गाथा पारायण आणि इतर कार्यक्रम सुरू आहेत. विविध दिंडीकरी, फडकरी यांच्या मुक्कामांची ठिकाणे हरिनाम संकीर्तनात न्हाऊन निघाली असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले आहे.
राज्यावर विशेषत: मराठवाडा, विदर्भावर दुष्काळी परिस्थितीचे सासट असतानाही गतवर्षीपेक्षा या वर्षी भाविकांची जास्त गर्दी असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. संस्थानच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी पहाटे संस्थानच्या वतीने पहाटे तीन वाजता काकडारती, चार वाजता श्रींची महापूजा संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व वारकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता वैंकुठगमनस्थान येथील श्री संत तुकाराममहाराज मंदिरातील महापूजा होईल. सकाळी १०.३० वाजता देऊळवाड्यातून पालखीचे वैंकुठगमन मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत देहूकर महाराजांचे वैंकुठगमन सोहळा प्रसंगावर कीर्तन होणार आहे. दुपारी १२.३० वाजता पालखी परत मुख्य मंदिरात येईल. रात्री व सकाळी पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तन कार्यक्रम, मुख्य मंदिर, वैंकुठस्थान मंदिर आणि जन्मस्थान मंदिर परिसरात होणार असल्याची माहिती संस्थानच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रात्रीपासूनच खासगी वाहनांना गावांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. उद्या आळंदी रस्त्यावर जकात नाक्याजवळ आणि देहूरोड रस्त्यावर माळवाडीजवळ वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. बीजोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे सदस्य असलेल्या विविध गावच्या दिंड्या व फडांवर गाथा पारायण, भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे कार्यक्रम सुरू आहेत. संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात हरिनाम सोहळ्यास सुरुवात झाली आहे. श्रीक्षेत्र येलवाडी येथे संत तुकाराममहाराज यांच्या कन्या श्री संत भागीरथी माता संस्थान, त्याचप्रमाणे येथील गाथा मंदिरात, संत तुकाराममहाराज वाङ्मय संशोधन मंडळ तथा गाथा मंदिर, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंडी समाज, श्रीगुरू बोधलेमहाराज संस्थान डिकसळ, रामचंद्र आबा सेवा मंडळ डिकसळ, रामदासमहाराज जाधव (कैकाडीमहाराज) यांच्या फडासह इंद्रायणी तीरावर व देहूगाव, येलवाडी, सांगुर्डी हद्दीत अनेक ठिकाणी हरिनाम सोहळ्याचे आयोजन भाविकांनी केले आहे. आध्यात्किमतेबरोबर लोकांचे प्रबोधन करण्याचे काम या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे.
बीजोत्सवासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जातात. मात्र, चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील येलवाडी गावच्या हद्दीत असलेला टोलनाका बंद झाल्याने अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले. बीडचे भाविक म्हणाले की, राज्यातून येणारा भाविक हा दर्शनासाठी येतो. भंडारा डोंगरावर जाण्यासाठी येथे भाविक हा रस्ता अवघा फर्लांगभर वापरतात. यासाठी भाविकांना टोलचालकांकडून गेल्या वर्षीपर्यंत टोलसाठी त्रास दिला जात होता. मात्र, यंदा येथील टोलनाका बंद झाल्याने तो त्रास कमी झाला आहे.
श्री संत तुकाराममहाराज मंदिर, वैकुंठगमन मंदिर, महाद्वार प्रवेश कमान व येथील नव्याने बांधण्यात आलेल्या धर्मशाळांवर रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपात्रात रोषणाईचे विलोभनीय प्रतिबिंब पडत आहे. रंगाची ही उधळण भाविकांना मोहवून टाकत आहे. मंदिर व धर्मशाळांवरील रोषणाई काही काळ थांबून पाहण्याचा मोह बहुतेकांना आवरता आला नाही . इंद्रायणी नदीवरील पूल, देहू-आळंदी रस्ता व देहू- देहूरोड रस्त्यावर महाद्वार कमान आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असे चित्र पाहायला मिळत होते. महाद्वार कमानीवर बाळासाहेब काळोखे यांनी व श्री संत तुकाराममहाराज मंदिर आवार व वैकुंठगमन मंदिराची रोषणाई संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)