व्यावसायिक प्रवेशासाठी तयार ठेवा ही कागदपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:52+5:302021-05-16T04:09:52+5:30
पुणे: कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तसेच, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे (सीईटी) ...
पुणे: कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तसेच, बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे (सीईटी) वेळापत्रकही जाहीर झाले नाही.परंतु, तंत्रशिक्षण विभागाच्या पदविका, पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावीत, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. त्यामुळे शासनाकडून सीईटी परीक्षा घेतली जाऊ शकते, यास पुष्टी मिळत आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदविका व पदवी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच एमई अथवा एमटेक, एमसीए, एमबीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबविली जाते. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रावर केली जाते. ऐनवेळी विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी आतापासून सुरुवात करावी, असेही तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र, पदवी अभ्यासक्रमासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेअर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे सैन्य दलातील अथवा अल्पसंख्याक संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणार्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे महत्त्वाची आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र योग्य वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या संवर्गातून निश्चिती केला जाईल, असेही तंत्रशिक्षण संचालनालयने स्षष्ट केले आहे.
................
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागतपत्रे
१) जात प्रमाणपत्र
२) जात वैधता प्रमाणपत्र
३) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
४) डोमिसाईल प्रमाणपत्र
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
६) अपंगत्वाचे प्रमाणपत्र .
७) आधार क्रमांक
८) बँक खाते