ॲट्राॅसिटीसाठी नातेवाइकांची उपस्थिती हा पुरेसा पुरावा नाही; न्यायालयाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:50 AM2022-08-26T11:50:40+5:302022-08-26T11:55:02+5:30
एकाला अटकपूर्व जामीन
पुणे : ॲट्रॉसिटीसाठी केवळ जवळचे नातेवाईक घटनास्थळी हजर असणे, हा पुरेसा पुरावा नसल्याचा निष्कर्ष काढत विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी एकाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ॲड. गणेश माने यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
ॲड. माने यांना ॲड. विजयकुमार कुंभार यांनी सहकार्य केले. या प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी केवळ फिर्यादींचे नातेवाईकच होते. इतर लोक उपस्थित नव्हते. त्यामुळे ॲट्राॅसिटी लागू होत नाही. आरोपीच्या कस्टडीची गरज नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. गणेश माने यांनी कला. शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल असलेली ही घटना ११ ऑगस्ट २०२१ रोजी मांडणगण फराटा येथे घडली होती.
मिथुनसह त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादींच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यावेळी आलेल्या पाहुण्यांना नवीन घर दाखवून परत घरी जात असताना तिन्ही आरोपींनी रस्ता अडविला. वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरूर पोलीस स्टेशनला दर शनिवारी हजेरी लावण्याच्या अटीवर हा निकाल दिला.