सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 01:25 PM2019-07-09T13:25:25+5:302019-07-09T13:25:53+5:30
समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो.
पुणे : समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्या ज्या विचारधारेचे सरकार सत्तेत आलेले आहे, ती विचारधारा संविधानाची चौकट मोडू पाहत आहे, अशी खंत राज्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. हे सरकार उलथवून टाकण्यासाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी एकविचार एकध्येयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी नगरसेवक लोकनेते दयाराम राजगुरू यांच्या ७४ व्या जन्मदिनानिमित्त लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि नगरसेवक आबा बागुल यांना थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे महासचिव माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे होते. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, नगरसेविका चाँद बी नदाफ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर उल्हास ढोले-पाटील, माजी महापौर रजनी त्रिभुवन, पीएमपीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे, नगरसेवक रफीक शेख, अभय छाजेड, अविनाश बागवे, पँथरचे सुखदेव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘उल्हासदादा हे वारकरी संप्रदायाचे आहेत आणि वारकरी संप्रदायाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून समतेचा विचार मांडला होता. तोच समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. त्या अर्थाने पसायदान आणि संविधानाच्या प्रस्तावनेत समता हे एक सूत्र दिसून येते. सध्याचे सरकार हे अल्पकालीन टिकणा-या विचारधारेवर सत्तेत आले आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून तो विचार संपणार नाही.
किशोर गजभिये म्हणाले, ‘सध्या मुलभूत हक्कांनाच सुरूंग लावला जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या देशातील दलित, मुस्लीम, अल्पसंख्यांक सुरक्षित नाही, तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. ज्या दिवशी भारत संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून उदयास येईल, तो दिवस देशासाठी सगळ्यात मोठी आपत्ती असेल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवले आहे. तो दिवस दूर नाही, असे वाटण्याजोगे वातावरण सभोवताली निर्माण झाले आहे.’ लता राजगुरू यांनी प्रास्ताविक केले. फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.