बैठकांचे ध्वनिचित्रमुद्रण सादर करा
By admin | Published: May 16, 2017 07:04 AM2017-05-16T07:04:33+5:302017-05-16T07:04:33+5:30
शाळेची शुल्कवाढ पालक शिक्षक संघाच्या संमतीने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शुल्क निश्चित करण्यासाठी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शाळेची शुल्कवाढ पालक शिक्षक संघाच्या संमतीने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शुल्क निश्चित करण्यासाठी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे ध्वनिचित्रण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार शुल्कवाढ करण्यापूर्वी पालक शिक्षक संघाची संमती घेतल्याचे ध्वनिचित्रमुद्रण शाळांनी सादर करावे, असे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले. बहुतांश शाळा पालक-शिक्षक संघाची संमती घेत नाहीत, तसेच बैठकांचे ध्वनिचित्रमुद्रणही केले जात नाही. त्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विनोद तावडे मागील आठवड्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आले होते, त्या वेळी शुल्कवाढीच्या प्रश्नावरून पालकांनी तावडे यांना घेराव घातला होता. या प्रश्नावर सोमवारी मुंबईत सुनावणी घेऊ, असे तावडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शुल्कवाढीच्या तक्रारी आलेल्या १८ शाळांपैकी विबग्योर स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, युरो स्कूल, सिंहगड स्प्रिंगडल स्कूल, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, इमॅन्युअल मारथोमा इंग्लिश मीडियम स्कूल ६ शाळांचे व्यवस्थापन आणि पालक प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक पार पडली.
शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालूनही शाळांच्या बेकायदेशीर शुल्कवाढीचा प्रश्न प्रलंबितच आहे. शिक्षण विभागाच्या आदेशांना शाळा जुमानत नसल्याने हा प्रश्न आणखी जटिल झाला आहे. सोमवारी शुल्कवाढीच्या प्रश्नावर शिक्षणमंत्र्यानी घेतलेल्या बैठकीतही यावर ठोस तोडगा निघू न शकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.