'सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जातेय, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:40 AM2021-11-15T06:40:56+5:302021-11-15T06:41:36+5:30
विक्रम गोखले; महागाई काय मोदींनी वाढविली का?
पुणे : आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिले असते तर काय बिघडले असते. हे पद दिले नाही, ही आमची चूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मान्य केले. जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. लोकांना फसवू नका अन्यथा लोक शिक्षा करतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप आणि सेनेने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. आम्ही तसे होऊच देणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम, मराठा-ब्राह्मण, मराठा-दलित, दलित-ब्राह्मण तेढ निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला.
कंगना रनौतशी सहमत
स्वातंत्र्य भीक मागून मिळाले, या कंगना रनौतच्या मताशी मी सहमत आहे. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, तर ते भीक मागून मिळाले. महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का? अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी १० हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहीत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.