पुण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव थेट केंद्राकडे दाखल
By admin | Published: December 16, 2015 03:30 AM2015-12-16T03:30:05+5:302015-12-16T03:30:05+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अग्निपरीक्षा देऊन साकार झालेला स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव मंगळवारी थेट केंद्राकडे सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी
पुणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची अग्निपरीक्षा देऊन साकार झालेला स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव मंगळवारी थेट केंद्राकडे सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वत: दिल्लीला जाऊन हा प्रस्ताव दाखल केला.
येत्या २६ जानेवारीला केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीतील शहरांची यादी जाहीर होणार आहे.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत देशभरातील ९८ शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याला सोमवारी तब्बल १३ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मान्यता देण्यात आली.
हा आराखडा केंद्राकडे सादर करण्यासाठी १५ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री काही उपसूचनांसह मंजूर झालेल्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यासाठी आयुक्त कुमार यांनी मंगळवारी स्वत: दिल्लीला जाऊन हा आराखडा सादर केला.
या योजनेच्या पुढच्या टप्प्यात ९८ शहरांमधून २० शहरांची निवड केली जाणार आहे. मात्र, ही संख्या ५ ते ६ शहरे इतकीही असू शकते, असेही सांगण्यात येत आहे.
नववर्षात प्रजासत्ताक दिनाला निवड होणाऱ्या शहरांची यादी पंतप्रधानाकडून जाहीर केली जाईल. दरम्यान, ही निवड स्पर्धात्मक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेला स्मार्टचा आराखडा केंद्राने घालून दिलेल्या निकषांशी तंतोतंत जुळणारा असल्याने स्मार्टच्या यादीत पुणे शहराचा वरचा क्रमांक असेल.
पुण्यापाठोपाठ भुवनेशवर शहराने या योजनेसाठी जोरदार तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील पहिल्या क्रमांकासाठी देशभरातील ९८ शहरांमध्ये पुणे आणि भुवनेश्वर या दोन शहरांमध्ये चढाओढ असेल.
या पार्श्वभूमीवर, शहरात घडलेल्या घडामोडींमुळे आता पूर्ण शहराचे लक्ष प्रसिद्ध होणाऱ्या यादीकडे लागले आहे.
(प्रतिनिधी)