मेट्रो प्रकल्पाचा आराखडा राज्य शासनाकडे सादर
By admin | Published: December 2, 2015 04:12 AM2015-12-02T04:12:10+5:302015-12-02T04:12:10+5:30
मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या पहिल्या टप्प्याच्या मार्गात झालेला बदल व प्रकल्प खर्चात झालेली वाढ यानुसार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेला सुधारित आराखडा
पुणे : मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या पहिल्या टप्प्याच्या मार्गात झालेला बदल व प्रकल्प खर्चात झालेली वाढ यानुसार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेला सुधारित आराखडा सोमवारी राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य शासनामार्फत तो केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे मेट्रोचा वाद निकाली काढून त्याच्या कामाला गती दिली आहे. मेट्रोच्या सुधारित प्रकल्पामध्ये प्रस्तावित खर्चाचा आकडा १२ हजार २२८ कोटींवर पोहोचला आहे. वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो जेएम रोडऐवजी नदीपात्राच्या कडेने वळविण्यात आली आहे. डीएमआरसीने शुक्रवारी हा आराखडा पुणे महापालिकेकडे दिला. त्यानंतर महापालिकेने सोमवारी हा सुधारित आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. राज्य शासनाकडून हा आठवडाभरात केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. प्री पीआयबी, त्यानंतर पीआयबीसमोर सादरीकरण, या प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची याला मंजुरी मिळेल. मार्च २०१६ अखेरपर्यंत मेट्रोच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)