पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करणार - चंद्रकांत पाटील
By निलेश राऊत | Published: December 22, 2023 03:07 PM2023-12-22T15:07:36+5:302023-12-22T15:08:27+5:30
नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाचा लोकार्पण कार्यक्रम पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला...
पुणे : शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले.
नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाचा लोकार्पण कार्यक्रम पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महापालिका सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्व. आमदार मुक्ता टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच स्व. मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही पाटील म्हणाले.
किरण ठाकूर म्हणाले, पुणे शहरात विविध क्रांतीकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे बलिदान लक्षात घेता आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. नागरिकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी अशा वास्तूचे जतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.