बुद्धीवादाची जोपासना करा - पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 10:33 PM2019-09-05T22:33:01+5:302019-09-05T23:24:06+5:30
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त ते पोलीस कॉन्स्टेबल या सर्व स्तरावरील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या भागातील शाळेत जाऊन शिक्षकांशी संवाद साधत गुरुजनांचे आर्शिवाद घेतले.
पुणे : शाळेत आपण शास्त्र, इतिहास, गणित शिकतो. त्याचबरोबर आपल्या बुद्धीनुसार यश मिळवितो. काही जण अव्वल नंबरमध्ये येतात. पण बुद्धीवाद सदैव जागृत ठेवणे आवश्यक आहे. जन्मापासून मरणापर्यंत बुद्धीवादीची जोपासना करण्यावरच आपला विकास अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही सर्व मुलांनी बुद्धीवादाची जोपासना करणे गरजेचे आहे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त ते पोलीस कॉन्स्टेबल या सर्व स्तरावरील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी आपल्या भागातील शाळेत जाऊन शिक्षकांशी संवाद साधत गुरुजनांचे आर्शिवाद घेतले. शहरातील ८३५ शाळांना भेट देऊन सुमारे ११०० ते १२०० शिक्षकांना शुभेच्छा पत्र देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षणमहर्षी डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारे शिक्षकांना शुभेच्छा देण्याचा नवीन उपक्रम राबविणे, चांगली बाब असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
भवानी पेठेतील रफी अहमंद किडवाई उर्दु माध्यमिक विद्यालयात व श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी भेट देऊन शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, महानगर पालिकेचे शिक्षणाधिकारी दीपक माळी, पोलीस निरीक्षक क्रांती पवार यांच्यासह पोलीस अधिकारी, शिक्षक उपस्थित होते. शहरातील सर्व शाळांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल ते वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनानिमित्ताने पोलिसांनी येऊन शुभेच्छा देणे हा माझा पहिलाच अनुभव आहे. पोलिसांचा उपक्रम नवीन आणि आनंददायक आहे. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पोलिसांनी आम्हाला शोधून प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व शुभेच्छा देणे यातच सर्व काही आले़ खूप आनंद झाला.
- डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक, सिंबायोसिस