मंडपाच्या बांबूचा अध्यक्षाला तडाखा
By Admin | Published: January 3, 2016 04:40 AM2016-01-03T04:40:26+5:302016-01-03T04:40:26+5:30
गणेश विसर्जनानंतर अनेक दिवस मंडपाचे बांबू, विसर्जन मिरवणुकीतील साहित्य तसेच रस्त्यावर पडून राहते. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. अशाच एका मंडळाने रस्त्यातील
पुणे : गणेश विसर्जनानंतर अनेक दिवस मंडपाचे बांबू, विसर्जन मिरवणुकीतील साहित्य तसेच रस्त्यावर पडून राहते. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. अशाच एका मंडळाने रस्त्यातील बांबू न काढल्यामुळे जखमी झालेल्या महिलेने संबंधित गणेश मंडळाची तक्रार केली होती. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिल कुलकर्णी यांनी संबंधित मंडळाच्या अध्यक्षाला ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी मंडपाच्या कंत्राटदाराची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
अखिल बिबवेवाडी गावठाण गणेश मंडळाचे अध्यक्ष मंगेश भाऊसाहेब कदम यांना दंड ठोठावण्यात आला आहे. अनिल कानडे हे मंडपाचे कंत्राटदार आहेत. फिर्यादी महिला दि. १३ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जात होत्या. चिंतामणी रुग्णालयासमोरील पदपथावर अखिल बिबवेवाडी गावठाण गणेश मंडळाच्या मंडपाचे बांबू पडले होते. या बांबूमध्ये पाय अडकून त्या रस्त्यात पडल्याने उजव्या हाताला आणि नाकाला मार लागला, तर उजव्या हाताच्या मनगटाचे हाड मोडले. त्यानंतर त्यांनी संंबंधित मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी केलेल्या तपासात बांबू गणेश मंडळाचे असल्याचे समजले. या घटनेचे दोन साक्षीदार होते. सरकारी वकील अनंत चौधरी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी मंगेश कदमला भारतीय दंडसंहिता कलम ३३७ आणि मुंबई पोलीस कायदा कलम १०२ अंतर्गत दोषी धरले. दोन्ही कलमाखाली त्याला अनुक्रमे ३०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवसांचा तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार दिवस साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.