संमेलनाध्यक्ष विरूध्द महामंडळ अध्यक्ष नवा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:43 AM2018-10-17T01:43:29+5:302018-10-17T01:43:32+5:30
संमेलनाध्यक्ष निवड मुठभरांच्या हाती : संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणजे शिस्तीचा भंग
पुणे : साहित्य महामंडळांच्या सन्माननीय सदस्यांना महामंडळाकडून काही अपेक्षित असल्यास ते महामंडळ अध्यक्षांना रितसर संबंधितांच्या मूळ स्वाक्षरीनिशी कळायला हवे. मात्र, तसे न करता कोणीही विपर्यस्त आणि कपोलकल्पित आरोप करून संस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या आरोपांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. घटनात्मक प्रक्रियेचा अवमान करून अशा बाबींची दखल घेतली जाण्याचे प्रयोजनच त्यांनीच संपुष्टात आणले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी निवड केली जाईल, अशी घटनादुरुस्ती केल्यानंतर सोमवारी देशमुख यांनी महामंडळाच्या या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि अध्यक्षांची सन्मानाने निवड या घटनादुरुस्तीच्या मूळ हेतूला काळिमा फासणारी आहे, असे सांगत संमेलनाध्यक्षाची निवड मूठभर लोकांच्या हाती येणार असल्याबद्दल त्यांनी नाराजी नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देशमुख यांच्या आक्षेपावर निशाणा साधला.
‘देशमुख स्वत: घटनादुरुस्ती प्रक्रियेत सहभागी असताना व तिथे आपले मत मांडण्याची त्यांना उपलब्ध संधी घेऊन व त्याला अनुसरून त्यांनी निवडीसाठी महामंडळाकडे नावदेखील पाठवले आहे, असे असताना संस्थात्मक सामूहिक निर्णय प्रक्रियेचा व सामूहिक विवेकाचा असा अवमान करणे अनाकलनीय आहेच; शिवाय ते महामंडळाच्या घटनेचा, घटनात्मक प्रक्रियेचा, प्रक्रियेत सहभागी संस्थांच्या भूमिकांचा अवमान करणारे आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
देशमुख यांची मूळ स्वाक्षरी असलेले कोणतेही पत्र अथवा प्रस्ताव महामंडळाच्या कार्यालयात आलेला नाही. तसे पत्र अध्यक्षांच्या अवलोकनात अद्याप आलेले नाही. पत्र मिळाल्यावर घटना व नियमानुसार जे यथोचित असेल त्याप्रमाणे विचार केला जाईल. मात्र, तसे काहीही होण्याची वाट न बघता अगोदरच कोणी अकारणच अधीर होत दबाव निर्माण करू पाहत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग, औचित्य, संकेत आणि परंपरा यांचाही भंग ठरतो. महामंडळ सदस्य असणाऱ्या कोणीही असे काहीही करणे अपेक्षित नाही.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी