दांडेगावकर साखर महासंघाचे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:45+5:302020-12-22T04:11:45+5:30
पुणे : महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश साळुंके-दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ...
पुणे : महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश साळुंके-दांडेगावकर यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. महासंघाच्या संचालक मंडळाच्या २१४ व्या शिखर बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.
दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु वळसे-पाटील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
दांडेगावकर हे सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबांधित असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. याशिवाय ते हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दांडेगावकर म्हणाले, “साखर कारखाना महासंघाचे नेतृत्व करणे ही निश्चितपणे मोठी जबादारी आहे. सहकारी साखर क्षेत्राशी संबधीत प्रश्न, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्या, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, साखर निर्यात आदी प्रश्नांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू.”
महाराष्ट्राचे श्रम मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे मावळते अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दांडेगावकर यांच्या निवडीचे स्वागत केले. दांडेगावकर हे अनुभवी नेते व कुशल प्रशासक आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पुढील वाटचाल करेल, त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळेल या शब्दात वळसे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. साखर महासंघाचे उपाध्यक्ष केतन पटेल, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनीही दांडेगावकर यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.