लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 01:26 PM2020-02-12T13:26:22+5:302020-02-12T13:37:59+5:30
‘आयएनएस शिवाजी’ संस्थेतून ७५ वर्षांत दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले
पुणे : नौदल अभियांत्रिकी प्रशिक्षण सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या लोणावळा येथील ‘आयएनएस शिवाजी’ या संस्थेला ‘प्रेसिडेंट कलर’ म्हणजेच राष्ट्रपती ध्वज (राष्ट्रपती निशाण) या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या गुरुवारी (दि. १३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा ध्वज संस्थेला प्रदान केला जाणार आहे. कोविंद बुधवारी पुण्यात येणार आहेत.
लोणावळा येथे १९४५ मध्ये स्थापन झालेली ‘आयएनएस शिवाजी’ संस्था १५ फेब्रुवारी रोजी आपल्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. या ७५ वर्षांत संस्थेतून दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, मित्रराष्ट्रांच्या नौदलाचे अधिकारी, तसेच इतर दलांतील सैन्य अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे काम ‘आयएनएस शिवाजी’ येथे होते. विशेषत: नौदल अभियांत्रिकी क्षेत्राचे प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येते. संस्थेच्या या कामगिरीसाठी ‘आयएनएस शिवाजी’ला राष्ट्रपतींच्या हस्ते हा ध्वज प्रदान केला जाणार आहे.
.......
राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असतात. त्यांच्याकडून हा ध्वज मिळणे ही अतिशय मोठी बाब असते. हा ध्वज सैन्यदलासाठी एक सर्वोच्च सन्मान समजला जातो. देशाच्या संरक्षण कार्यात अतुलनीय कार्य केलेल्या
४संरक्षण क्षेत्रातील दल, संस्था किंवा संघटनेला ध्वज प्रदान केला जातो. संस्थेचे निशाण अधिकारी राष्ट्रपतींकडून हा ध्वज स्वीकारतील, अशी माहिती आयएनएस शिवाजी प्रशासनातर्फे देण्यात आली.
...........
याप्रसंगी विशेष संचलन होणार आहे. यामध्ये नौदलाचे १३० अधिकारी आणि ६३० नाविक सहभागी होणार आहेत.
४या वेळी राष्ट्रपतींना १५० जवानांकडून ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला जाणार आहे.
४ तसेच, आयएनएस शिवाजीची ७५ वर्षांची यशोगाथा उलगडणाºया स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.