Ram Nath Kovind | राष्ट्रपतींचे पुण्यात आगमन, राज्यपालांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:37 AM2022-05-27T08:37:08+5:302022-05-27T08:40:50+5:30
राष्ट्रपतींच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद होत्या...
पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गुरुवारी (ता. २६) वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रपतींच्या समवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी, पी. पी. मल्होत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हेही उपस्थित होते. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित शतकोत्तर सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी (ता. २७) दुपारी १२ वाजता होणार आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते तीन कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. भाग्यश्री पाटील व डॉ. प्राजक्ता काळे यांचा समावेश आहे.