राष्ट्रपतींनी मला एक खून माफ करावा : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:45 PM2018-07-01T15:45:40+5:302018-07-01T15:56:31+5:30
पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी मोबाईलच्या अवाजवी वापरावर आणि दुरुपयोगवर तोफ डागली.
पुणे : सध्या लोक डोळ्यांनी कमी आणि मोबाईलने जास्त बघतात. त्यामुळे मला मोबाईल निर्माण करणाऱ्या माणसाचा खून करायचा आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रक्षुब्ध भावना व्यक्त केल्या आहेत. त्याकरिता राष्ट्रपतींना भेटायची इच्छा असून त्यांना एक खून माफ करायला सांगणार असल्याचेही ते म्हणाले.
पुणे महापालिकेचे मनसे गटनेते वसंत मोरे यांच्या प्रभागातील विकासकामांचे अनावरण करण्यासाठी त्यांनी हजेरी लावली होती. शहरातील हजरत ख्वाजा मोहिनुद्दिन चिस्ती हॉस्पिटल आणि कात्रज भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, महिला अध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी पुण्यातील मतदारांविषयी नाराजीही व्यक्त केली. माझे सर्व नगरसेवक उत्तम काम करतात हे दिसतही आहे, मात्र लोक कामाला मतदान करतात का असा प्रश्न मला सतत पडत आहे असे उदगार त्यांनी काढले. माझे नगरसेवक प्लास्टिक बंदीवर पूर्वीपासून प्रकल्प राबवत आहेत. पण जर आम्हाला मतदान होणार नसेल तर काम कोण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मला मोरे यांनी निर्माण केलेले उद्यान बघायचे असून कोणालाही न सांगता मला ते बघायला बोलवा असेही ते म्हणाले.मला जे काही बोलायचे आहे ते संध्याकाळी वांद्रयात बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .