लसीकरण केंद्रावरील ‘माननीयां’च्या बॅनरबाजीला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:29+5:302021-05-19T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील लसीकरण केंद्रे ही महापालिकेच्या खर्चाने ‘माननीयां’च्या प्रचाराचे प्रमुख केंद्र बनत चालल्याने मंगळवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील लसीकरण केंद्रे ही महापालिकेच्या खर्चाने ‘माननीयां’च्या प्रचाराचे प्रमुख केंद्र बनत चालल्याने मंगळवारी (दि. १८) महापालिका आयुक्तांनीच यावर चाप आणला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सूचना फलकांव्यतिरिक्त इतर कोणतेही खाजगी बोर्ड व खाजगी जाहिराती लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लावू नयेत अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास जाहिरातबाजी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५’ अन्वये कारवाई करण्याची सूचना संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्तांना दिली आहे. कोणतीही व्यक्ती लसीकरण सत्राच्या ठिकाणी अडथळा निर्माण करत असेल तर संबंधित व्यक्तीविरुध्द नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
याचबरोबर नावनोंदणी शिवाय येणाऱ्या नागरिकांची स्वतंत्र रांग करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच त्यांची नोंदणी करावी व महापालिकेचे टोकन त्यांना द्यावे. लसीकरण सकाळी दहा वाजता सुरू करण्याचेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे. यामुळे यापुढे माननीयांचे फोटो असलेले टोकन अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा टोकन, वाटपातील हस्तक्षेप, ओळखीच्या नागरिकांनाच वितरण आदी गोष्टींना आळा बसणार आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांवर केवळ ज्या व्यक्तींनी कोविन पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंद केली आहे. तसेच जे नागरिक स्वत: लसीकरणासाठी आले आहेत, त्यांनाच केंद्राच्या आवारात प्रवेश द्यावा. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही लसीकरण केंद्राच्या आवारात प्रवेश देऊ नये असे स्पष्ट केले आहे. तर लसटोचक यांच्या व्यतिरिक्त कोणीही लस कुपीला व इतर लसीकरण साहित्याला हात लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लसीकरण केंद्राच्या बाहेर कोविड लस कुपीला कोणीही घेऊन जाऊ नये तसे आढळून आल्यास केंद्र प्रमुखांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लागलीच जवळच्या पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
----