पुण्यात हिंदू महिलेवर धर्मांतराचा दबाव? ‘लव्ह जिहाद’चा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:20 IST2025-02-04T14:20:26+5:302025-02-04T14:20:41+5:30
३२ वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप

पुण्यात हिंदू महिलेवर धर्मांतराचा दबाव? ‘लव्ह जिहाद’चा गंभीर आरोप
- अश्विनी जाधव केदारी
पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'च्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा आरोप भाजप नेत्या मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी केला आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात ३२ वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
३२ लाखांची फसवणूक
सिंहगड रस्ता परिसरातील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर आरोपी अकबर बहादूर शेख याने तिचा विश्वास संपादन करत जवळीक साधली. त्यानंतर, तिच्या भविष्यनिर्वाह निधीतील आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३२ लाख रुपये हडपल्याचा आरोप आहे. महिलेने जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचा गंभीर दावा केला आहे.
‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ – नागपुरे
'या घटनेबाबत माहिती देताना मंजुषा नागपुरे म्हणाल्या,'या प्रकरणात आरोपीने महिलेच्या मनात सहानुभूती निर्माण करून तिच्या जवळीक साधली. मात्र, त्याच्या इतर फसवणुकीच्या घटना समजल्यानंतर महिलेची फसवणूक झाल्याचे उघड झाले. अशा प्रकारचे अनेक प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी न घाबरता पुढे यावे आणि कायदेशीर मार्गाने आरोपींना धडा शिकवावा.'
५० हून अधिक महिलांची फसवणूक?
भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी दावा केला की,'गेल्या वर्षभरात पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा ५० हून अधिक घटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, अनेक महिला भीतीपोटी किंवा समाजाच्या दबावामुळे तक्रार करत नाहीत. परिणामी, अनेक घटना समोरच येत नाहीत.'
‘मॅट्रिमोनियल साइट्स आणि सूचक मंडळांची पडताळणी आवश्यक’
याच मुद्द्यावर बोलताना नागपुरे यांनी मॅट्रिमोनियल साईट्स आणि वधू-वर सूचक मंडळांवरही संशय व्यक्त केला. काही परधर्मीय पुरुष बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटी माहिती देत महिलांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांनी योग्य पडताळणी करावी, अन्यथा त्यांनाही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जाईल.' असे नागपुरे म्हणाले.
महिलांना पुढे येण्याचे आवाहन
नागपुरे आणि मंजुषा नागपुरे यांनी पीडित महिलांना धैर्याने पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणात सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.