पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:14 IST2024-12-19T16:14:18+5:302024-12-19T16:14:33+5:30
दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार
पुणे : लोकसंख्या वाढीमुळे रेल्वेची प्रवासी संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी अपुरे पडू लागले आहे. अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून खडकी आणि हडपसर स्थानकांचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे. या दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पुणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने रेल्वे सुविधांचा विस्तार झाला नाही. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या रेल्वेस्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उरुळीला नवीन मेगा टर्मिनल उभारण्यात येणार आहे. याच बरोबर खडकी आणि हडपसर या स्थानकांचा विकास करून त्यांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांची प्रवासी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानकावरील ताण कमी करून पर्यायी स्थानकांचे जाळे निर्माण होणार आहे. तसेच, पुणे-नगर रेल्वेमार्गाच्या प्रस्तावालाही गती देण्यात आली आहे. याच बरोबर पुणे-मुंबई या दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे, उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडणाऱ्या गाड्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशांना असा होणार फायदा...
- पुणे स्थानकावर रेल्वेची संख्या जास्त असल्याने फलाट उपलब्ध न होणे, नव्या गाड्या सुरू न होणे असे प्रकार घडतात ते बंद होतील.
- फलाट उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वेगाड्यांना सिग्नलवर थांबावे लागते.
- यामुळे २० ते २५ मिनिटे वाया जातात.
- स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू होतील.
- पुणे स्थानकावरून गाडी लवकर सुटेल, त्यामुळे फलाट उपलब्ध होतील.
असे असणार टर्मिनल...
- खडकी स्थानकावर सध्या चार फलाट आहेत.
- त्यापैकी दोन फलाट रेल्वे वाहतुकीसाठी वापरले जातात.
- तिसरा रेल लेव्हल फलाट आहे. येथून सैन्याच्या रेल्वेची वाहतूक होते.
- चौथा फलाट मालगाड्यांसाठी वापरला जातो.
- टर्मिनल केल्यावर चारही फलाट प्रवासी रेल्वेसाठी वापर होणार.
हडपसर टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे काम सुरु आहे. - डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग