ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:04+5:302021-02-25T04:14:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील, शिक्रापूर, रांजणगाव या मोठ्या गावांसह दौंड, हवेली आणि मावळ आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील, शिक्रापूर, रांजणगाव या मोठ्या गावांसह दौंड, हवेली आणि मावळ आणि जुन्नरच्या काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यासाठीच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सतर्क राहून खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेने या भागांमध्ये कंटेनमेंट झोन सुरू करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी रुग्णसंख्या विचारात घेतली जात आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याआधी बाधित रुग्णांची संख्या त्यांचे प्रमाण विचारात घेतले जात आहे. आवश्यकता असेल तेथे तत्काळ सेंटर सुरू केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये कोरोनारुग्णांची संख्या अद्यापही नियंत्रित आहे. परंतु शिक्रापूर, रांजणगाव तसेच दौंड तालुक्यातील काही ठिकाणे हवेली तालुक्यातील शहरालगतच्या परिसरात बाधित रुग्ण वाढू लागल्याने कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी सर्वेक्षणाला आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. दोन-तीन दिवसात कंटेनमेंट क्षेत्र निश्चित केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
---
महामार्गावरील ढाबे रात्रीचे सुरू राहणार
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र महामार्गांवरील वाहतूक तसेच अत्यावश्यक गरज म्हणून महामार्गालगतच्या ढाबे रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भात उपविभागीय अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्या परवानगीने ढाबे सुरू ठेवता येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
---
शहरातील भाजीपाल्याच्या मंड्या ही गर्दीची ठिकाणी झाली आहेत. ग्रामीण भागातून तसेच शहराच्या आणि उपनगरातून मोठ्या प्रमाणात मंडईमध्ये बाजाराच्या निमित्ताने ये जा केली जाते. येथील गर्दी टाळण्यासाठी या मंडई मोकळ्या जागेत हलवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला केली आहे. मंडईतील विक्रेते सुरक्षित अंतरावर आणि मोकळ्या जागेत बसल्यास गर्दी कमी होऊन संसर्ग रोखण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.