ग्रामवर्गणीतून करणार दुष्काळावर मात, नाम फाऊंडेशन व डोणजे ग्रामस्थांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:38 PM2018-04-17T18:38:57+5:302018-04-17T18:38:57+5:30
नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते .
खडकवासला: सिंहगडाच्या पायथ्याशी असलेला या परिसरात पावसाळ्यात धुवांधार पाऊस पडतो. येथील पावसाचे प्रमाण १२५० मिलिमीटर इतके आहे. या परिसरात डोंगर उतार असल्यामुळे सर्व पाणी वेगाने वाहते. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पाणलोट विकासाच्या कोणत्याही योजना या भागात आजतागायत राबविण्यात आल्या नाही. त्यामुळे पावसाळ्यात दोन- तीन मीटरवर असणारी भूजल पातळी उन्हाळ्यात सहा मीटरपर्यंत खालावलेली असते. डोंगर उतार, खडक व मुरमाड जमीन यांच्यामुळे पाणी जिरण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते. पावसाळा संपला की, शेती सिंचनासाठी जमिनीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी शेती करणे खर्चिक आणि अवघड जाते.
या पार्श्वभूमीवर नाम फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुरू किल्ले सिंहगड पायथ्याच्या डोणजे गाव परिसरातील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. लोकवर्गणीतून करण्यात येणाऱ्या या कामासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नाम ने या कामासाठी पोकलेन दिले आहे. दैनंदिन खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. या कामानंतर ओढ्यात साखळी बंधारे बांधण्यात येणार आहे. गडाच्या पायथ्यापासून सीताबाईचा दरा येथून पुढे सहा किमी.पर्यंत या ओढ्यात काम करण्यात येणार आहे.
..........................
पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो. भातशेती हा येथील प्रमुख शेती पीक आहे. धरणापासून जवळ असला तरी धरणापेक्षा उंच हा प्रदेश आहे. शेतीसिंचनासाठी पाणी पुरवठ्याची कोणतीही योजना येथे नाही. पावसाळ्यातील चार महिन्यात पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. पडणाऱ्या पाण्यावर पुणे जिल्ह्यातील शेती सुपीक झाली आहे. शासनाचे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात. तथापि शासनाने हा परिसर सुपीक होण्यासाठी विचार केलेला नाही अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
.......................
या कामांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून हे पाणी नंतर उपलब्ध होते. विहिरींची पाणी पातळी सुधारण्यासाठी मदत होईल.ओढ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणामुळे पावसाळ्यातील पाणी साठवून आणि टिकून राहील. उन्हाळ्यातील पाणी टंचाई काहीप्रमाणात दूर होण्यास या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. नाम फाऊंडेशन व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून उभे राहणारे असे काम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. गुलाब कडलग, मंडल कृषी अधिकारी, हवेली