अन्यायकारक जमीन संपादन रोखू, शेतकऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 01:07 AM2018-11-08T01:07:55+5:302018-11-08T01:08:04+5:30
चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला.
काळुस - चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना मानणा-या शेतक-यांनी या प्रश्नावर एकत्र येत येथे झालेल्या ग्रामसभेत वरील निर्धार व्यक्त केला.
खेड तालुक्यातील काळुस गावच्या पुनर्वसन जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. चासकमान धरणाचा उजवा कालवा काळुसमधून जातो. वीस वर्षांपूर्वी या कालव्याचे थेंबभरही पाणी गावात आले नाही. कालवा आणि पोटचाºयांसाठी शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या. गाव लाभक्षेत्रात येत असल्याचे दाखवून सुमारे सहाशे एकर क्षेत्रावर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात आले. मुळात कालव्याला पाणी आलेच नाही, तर लाभक्षेत्राच्या नियमानुसार चुकीचे व अन्यायकारक भूसंपादन झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे जमीन विकसन, खातेफोड कर्ज काढणे आदी अनेक समस्यांना शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे.
यापूर्वी गावातून रिलायन्स वायूवाहिनी, एच. पी. वायूवाहिनी या प्रकल्पांसाठीही शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. आता नव्यानेच भामा-आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांसाठीही येथील जमिनी संपादित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. गावातील शेतकरी याविरोधात एकवटला असून विरोधाची ठाम भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच यशवंत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढारी व शेतकºयांची उपस्थिती होती. माजी पंचायत समिती सदस्य बबन अरगडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौडकर, सुभाष पवळे, माजी सरपंच गणेश पवळे, माजी उपसरपंच केशव अरगडे, मोहन पवळे, विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल अरगडे, विठाबाई खलाटे, संदीप पोटवडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. काहीही झाले तरी जमिनीचा ताबा घेऊ देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकºयांनी यावेळी व्यक्त केली. मोहन पवळे यांनी आभार मानले.
जमीन संपादनाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि शेतकरी सर्व मतभेद विसरून एकत्र आले आहेत. आपल्यातील दुहीचा फायदा शासन घेत आहे. त्यामुळे जे होईल ते मिळून करू, अशी भावना व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकºयांचे समाधान झाल्याशिवाय संपादन करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी ३४ एकर जमिनीचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे, ही दिशाभूल असून याबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजकीय पक्षांकडून आपला फक्त वापर होत असल्याचेही काही शेतकºयांनी बोलून दाखविले. आता आपली लढाई आपणच लढू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.