मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली; इंदापूरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 07:26 PM2023-03-26T19:26:54+5:302023-03-26T19:27:10+5:30
रस्त्यावर सांडलेल्या मिथेनॉलवर पाण्याचे फवारे मारण्यात आले
इंदापूर: इंदापूरपोलिस व कर्मयोगी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने त्वरित हालचाल करत, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव येथे पलटी झालेल्या टँकरमधील मिथेनॉलची गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली.
रविवारी (दि. २६) पहाटे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव नजीक काळेवाडीच्या उतारावर, सोलापूरकडे ज्वलनशील मिथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरचे पुढील भागातील डाव्या बाजूचे चाक तुटल्याने तो पलटी झाला. त्यातून हजारो लिटर मिथेनॉल रस्त्यावर सांडले. महामार्ग पोलिसांनी या घटनेची माहिती तातडीने इंदापूर पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ कर्मयोगी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. रस्त्यावर सांडलेल्या मिथेनॉलवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. पलटी झालेल्या टँकरला पूर्ववत करून मिथेनॉलची गळती रोखण्यात आली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.