PFI : पुण्यात 'पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई
By विवेक भुसे | Published: September 27, 2022 03:27 PM2022-09-27T15:27:41+5:302022-09-27T15:28:04+5:30
प्रतिबंधात्मक कारवाई करुन ताब्यात....
पुणे : पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले.
अब्दुल अजीज बन्सल (रा. सुसवाली काॅम्प्लेक्स, कोंढवा), माज फैजान शेख, मोहम्मद कैस अन्वर शेख (दोघे रा. अशोका म्युज, कोंढवा), काशीफ नजीर शेख (रा. अशोक सुमीत सोसायटी, नुराणी कब्रस्तानजवळ, कोंढवा), दिलावर करीम सैय्यद (रा. युफोरिया सोसायटी, कोंढवा), आयमूल रशीद मोमीन (रा. एक्सेल होम्स सोसायटी, कोंढवा) अशी कारवाई करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कोंढवा भागात कारवाई केली. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन घोषणाबाजी केली. पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन करुन सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतल्याचे कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.