पोलिसांची धडक प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:14 PM2018-08-26T23:14:36+5:302018-08-26T23:15:36+5:30
२४ रोडरोमिओंवर प्रतिबंधात्मक कारवाई : ५५ अल्पवयीनांसह व पालकांनाही दणका
सासवड : सासवड शहर परिसरात गेल्या दोन दिवसांत पोलीस तसेच पोलीस मित्रांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या २४ रोडरोमिओंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यासोबतच अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिलेल्या ५५ पालकांसह मुलांवरही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
सासवड शहरात सध्या सार्वजनिक ठिकाणी शाळा कॉलेज परिसरात वारंवार होणारी शांतता भंग तसेच बेशिस्त वाहनचालक व वाहने चालवणारे अल्पवयीन मुले, मुली सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवस साजरे करणारे आदींवर कारवाईचा बडगा पोलिसांच्या वतीने उगारण्यात आला आहे. सासवडमधील यासंबंधी सर्व विद्यालये व महाविद्यालय, खासगी क्लासच्या संबंधितांची बैठक घेऊन मार्गदर्शनपर सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सासवडमध्ये सध्या साध्या गणवेशातील पोलिसांची गस्त ठेवण्यात आली असून, विशेषत: शालेय मुलींच्या तक्रारी आल्यानंतर त्यावर काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु ती पुरेशी नसल्याचे सांगत त्यांनी यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले. ५५ अल्पवयीन मुलांना गाड्या चालवण्याचे परवाने नसतानादेखील त्यांच्या पालकांनी त्यांना गाड्या चालविण्यास दिल्यामुळे त्यांच्यावरही न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याचे सांगितले.