तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By admin | Published: February 14, 2015 12:06 AM2015-02-14T00:06:01+5:302015-02-14T00:06:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाकण, बारामती येथे उद्या दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व
मंचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाकण, बारामती येथे उद्या दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर व इतर दोघांना पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले. मांडवगण फराटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात त्यांनी घोषणाबाजी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
वनाजी बजरंग बांगर, सोमनाथ रामचंद्र पोखरकर यांचा समावेश आहे. मोदी यांचा दौरा संपल्यानंतरच त्यांना सोडून दिले जाणार आहे.
१९ जानेवारीला मांडवगण फराटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली होती. भाषणात अडथळा आणला होता. त्या वेळी तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती. दरम्यान, प्रभाकर बांगर यांनी पोलिसांनी आमच्यावर अन्याय केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दूध दरवाढी संदर्भात ८ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, २५ दिवस घेऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना राज्य सरकार न्याय देत नसल्याचे बांगर म्हणाले. पोलीस निरीक्षक मोहन जाधव म्हणाले, ‘‘मांडवगण फराटा येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ घातला होता. उद्याच्या सभेत त्यांनी गैरप्रकार करू नये म्हणून त्यांना ताब्यात घेतले आहे.’’
(वार्ताहर)