दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 03:53 PM2019-12-20T15:53:37+5:302019-12-20T15:56:13+5:30

जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्यांची पसंती

The price of hybrid cows increasing due to rising milk prices | दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

Next
ठळक मुद्देगाईंपासून चांगले दुग्धोत्पादन बारामती येथील बाजारात संकरित गाईंच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ

बारामतीच्या बाजारातील चित्र : ४० ते ९० हजार रुपयांना संकरित गाईंची विक्री
बारामती : अनेक दिवसांपासून जनावरे बाजारातील मरगळ दूर होऊ लागली आहे. सोमवारपासून दुधाच्या खरेदीदरात २ रुपयांची वाढ झाल्याने बारामती येथील बाजारात गुरुवारी (दि. १९) जनावरांच्या किमतीमध्ये वाढ झाली. ४० ते ९० हजारांदरम्यान संकरित गाईंची खरेदी-विक्री झाली. तर, होस्टन फ्रिजीयन जातीच्या एका गाईची विक्री १ लाख १८ हजार रुपयांना झाली. 
आधी दुष्काळी स्थिती, त्यानंतर परतीच्या पावसाचा धुमाकूळ यामुळे चाऱ्याच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. त्यातच दुधाचे दरदेखील पडल्याने जनावरे बाजारात मरगळ आली होती. मात्र हळूहळू ही परिस्थिती सुधारत चालली असून सोमवारी जनवारांचा बाजार वधारला.
सोमवारपासून दुधाला ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ आणि २९.५० डिग्री असणाऱ्या दुधाला प्रतिलिटर २९ रुपये एवढा खरेदी दर दूध संस्थांकडून मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी बारामती येथील बाजारात संकरित गाईंच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली. ४० हजारांपासून पुढे गाईंचे दर होते. दुग्धव्यवसायासाठी संकरित गाईंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्यांची पसंती असते. तसेच, या गाईंपासून चांगले दुग्धोत्पादन शेतकऱ्यांना मिळते. 
बारामती तालुक्यासह इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर, अकलूज, माळशिरस, राशीन आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकरी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बारामतीच्या बाजारात जनावरे दर आठवड्याला दाखल करतात. तसेच, बाजार समितीच्या वतीनेदेखील येथे विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर आठवड्याला गुरुवारी येथे परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
.....
दुधाचे दर वाढल्याने बाजारात गाईंची आवक आणि दरही चांगले राहिले आहेत. त्यातुलनेत म्हशी आणि बैलांची आवक होत नाही. दुग्धव्यवसायासाठी आवश्यक जातिवंत गाईंची आवक दर आठवड्याला बाजारात होत असते.- अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
......
बारामती येथील बाजारात ४०० गाईंची आवक झाली होती. या गाईंना ४० ते ९० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यातुलनेत केवळ २५ म्हशी व १५ खिलारी बैलांची आवक झाली. म्हशींना ४० ते ७५ हजारापर्यंत दर मिळाला, तर बैलांना ३५ ते ५५ हजार रुपये इतका दर मिळाला. 

.............................
सध्या ऊस हंगाम सुरू आहे; त्यामुळे कारखाना परिसरात येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांकडून चांगल्या जातींवर खिलारी बैलांना मागणी असते. मात्र, सध्या कारखान्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने ‘मिनी ट्रॅलर’मधून ऊसवाहतूक वाढल्याने बैलांची आवक तसेच किमतीही मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत.

Web Title: The price of hybrid cows increasing due to rising milk prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.