साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:17+5:302021-06-25T04:09:17+5:30

(स्टार ८४२ डमी) पुणे : उत्पादन कमी आणि मागणी जास्त, उसाचे भाव वाढले, घरगुती वापर वाढल्याने मागील दोन-वर्षांपासून साखरेपेक्षा ...

The price of jaggery is higher than sugar | साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

Next

(स्टार ८४२ डमी)

पुणे : उत्पादन कमी आणि मागणी जास्त, उसाचे भाव वाढले, घरगुती वापर वाढल्याने मागील दोन-वर्षांपासून साखरेपेक्षा गूळच जास्त भाव खात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातही लोक सेंद्रिय गूळ घेण्यास अधिक पसंती देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या साखरेचा क्विंटलला ३३००-३३५० रुपये, तर गुळाचा ३५००-३६०० रुपये असा दर आहे.

कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन यामुळे मागील दोन वर्षांपासून भाव तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या दशकभरात अनेक बदल झाले आहेत. आहारात गूळ हवाच, त्याचे अनेक फायदे होत आहे हा अनेक आहार तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरत आहे. त्यामुळे कोणत्याही रसायनमिश्रित गुळाएवजी सेंद्रिय गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते.

-----

असा वाढला गुळाचा भाव

वर्ष गूळ साखर

२०१७ २४५०-३१५० ३१००-३२५०

२०१८ २६००-३३०० ३२००-३३००

२०१९ २८५०-३४०० ३२५०-३३००

२०२० ३०००-३५०० ३३००-३३५०

२०२१ ३५००-३६०० ३३००-३३५०

-----

शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी

कोट

१) मागील दहा वर्षांत अनेक बदल झाले आहेत. उसाच्या भावात सातत्याने वाढ झाली आहे. साखरेचे उत्पादन जास्त, तर गुळाचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने गुळाचे भाव काही वर्षांत जास्त असल्याचे कारण आहे.

- जवाहरलाल बोथरा, व्यापारी

----

२) साखरेचे दर निश्चित केलेले आहे. त्यात राज्य शासनाचा कोटा ठरलेला आहे. गुळाच्या तुलनेत उत्पादनही जास्त होत असल्यामुळे मागील तीन-चार वर्षांत साखरेच्या भावात जास्त बदल झाला नाही.

- विजय गुजराथी, व्यापारी

----

गावात मात्र साखरच

कोट

ग्रामीण भागात अनेकांना आर्थिकदृष्ट्या गूळ घेणे परवडत नाही. त्यामुळे साखरेचे भाव नियंत्रणात असल्याने लोक जास्त करून साखर वापरतात.

- विजय वाळके, व्यापारी

-----

गुळाचा चहा बनले स्टेटस

* गुळामध्ये साखरेच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात.

* गुळाचा चहा घेतल्यास मायग्रेनमध्ये आराम मिळू शकतो.

* गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर आहारात गुळाचा मर्यादित वापर उपयुक्त ठरू शकतो.

----

प्रकृतीसाठी गूळ उत्तमच

“साखर आरोग्यासाठी हानिकारक असते. कारण त्यातून कॅलरीशिवाय शरीराला काहीच मिळत नाही. या उलट गुळामध्ये लोह, पोटॅशियम अशा घटकांचा समावेश असतो. आरोग्याच्या दृष्टीने रसायनविरहित, काळा गूळ वापरणे केव्हाही चांगले. गूळ-शेंगदाणे लाडूही पौष्टिक असतात.”

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

Web Title: The price of jaggery is higher than sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.