सिमेंटच्या जंगलात काळया मातीला माेलाचा भाव; घटस्थापनेला मोठ्या प्रमाणावर विक्री
By अजित घस्ते | Published: September 25, 2022 06:34 PM2022-09-25T18:34:57+5:302022-09-25T18:35:05+5:30
माती वीस रुपयांना एक गलास तर होलसेल मध्ये पंचवीस किलोच्या पोत्याला 150 ते 200 रुपये मोजावे लागतात
पुणे : ‘शहरात माती सुध्दा विकते’ ही म्हण सहजच गप्पांतून गमतीने म्हटली जाते. मात्र, तीच म्हण आता वास्तव ठरली आहे. पुण्यासारख्या शहराच्या सिमेंटच्या जंगलात आता शक्यताे मातीही पाहायला मिळत नाही. त्यातच आता घटस्थापना काळात घट बसवण्यासाठी काळी माती लागते. म्हणूनच ही काळी मातीदेखील मार्केटयार्डात विक्रीसाठी आली आहे. ही माती वीस रुपयांना एक गलास तर होलसेल मध्ये पंचवीस किलोच्या पोत्याला 150 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत.
नवरात्रीनिमित्त घराेघरी आईचा जागर हाेताे. यावेळी घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्याची बाजारात लगबग सुरू झाली आहे. घटाला लागणाऱ्या साहित्य, फळे, फुले, केळीची पाने, सुपारी, हळद कुंकू ,कडधान्य त्याच बरोबर माती ही लागते. ही माती पूर्वी गावाकडे फुकट व हवी तितकी मिळते. पण शहरात याच मातीला माेठे माेल आले आहे.
शहरात जिकडे पाहावे तिकडे टाेलेजंग इमारती आणि सिमेंटचे रस्ते झाले आहेत. शहरातील चकचकित साेसायटयांच्या पार्किंगमध्येही सिमेंटचे ब्लाॅक बसवल्याने उच्चभ्रुंसह मध्यमवर्गीयांचा तसा मातीशी थेट संबंधच तुटला आहे. यामुळे मातीच पाहायला देखील मिळत नसल्याने सर्व साहित्य खरेदी करताना शहरात माती देखील खरेदी करावी लागत आहे. मार्केट यार्डात सद्या औरंगाबाद, लोणी काळभोर, सासवड, भोर या भागातील नागरिक नवरात्र उत्सव निमित्ताने माती विकत आहेत. फुकट असणारी माती सुद्धा खरेदी करावी लागत आहे. दुसरीकडे त्यातून आर्थिक राेजगारही उपलब्ध हाेत आहे.
''शहरात काळी माती मिळत नाही म्हणून दर वर्षी माती विक्रीसाठी येत असतो. दोन वर्षांनंतर नवरात्र उत्सव माेठया प्रमाणात सुरू होत आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. पंचवीस किलोच्या पोत्याला 150 ते 200 रुपये भाव मिळत आहे. - आश्पाक पठाण, विक्रेता, मार्केटयार्ड''
''पारंपरिक पद्धतीने घटस्थापना बसवण्यासाठी काळया मातीचा वापर केला जातो. यासाठी पूर्वी गावाकडे मोफत माती मिळत होती मात्र सद्या मातीला ही आला भाव आला आहे. त्यामुळे माती खरेदीसाठी मार्केटयार्ड येथे आले असता 20 रुपयांना एक गलास माती विकत घ्यावी लागली. - शांताबाई गायकवाड, ग्राहक''