संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि लिंबाचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:56+5:302021-03-22T04:09:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळविभागात संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि लिंबाच्या दरात वाढ झाली. तर, आवक वाढल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील फळविभागात संत्रा, मोसंबी, कलिंगड आणि लिंबाच्या दरात वाढ झाली. तर, आवक वाढल्याने डाळिंब आणि खरबुजाच्या दरात घट झाली. तर अननस, पपई, चिक्कू, स्ट्रॉबेरी आणि पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या दरात किलोमागे एक रुपयांनी वाढ झाली आहे. तर आवक जास्त झाल्याने खरबुजाच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी घट झाली. संत्र्यांच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मोसंबी २० टक्क्यांनी महागली आहे. लिंबाच्या दरात गोणीमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. डाळिंबाची आवक वाढल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली.
रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी १० ते १५ टन, संत्री ३० ते ३५ टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू १०० क्रेट, चिक्कू दोन हजार गोणी, खरबुजाची ५० ते ६० टेम्पो, स्ट्रॉबेरी ३ टन, इतकी आवक झाली.
---
निर्बंधामुळे फुलांना उठाव नाही
मार्केट यार्डात फुलांची आवक नेहमीच्या तुलनेत कमी होत आहे. तरीही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फुलांना बिलकुल मागणी नाही. फुलबाजारात अनेक गाळ्यावर माल विक्रीअभावी शिल्लक राहत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे.
मागील आठवड्यापेक्षाही या आठवड्यात फुलांना मागणी नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन सदृश निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, तसेच, सण-उत्सवाच्या वेळेला मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणाम फुलांच्या मागणीवर झाला असल्याचे अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर आणि व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.