ऊस बेण्याच्या किमती कडाडल्या
By admin | Published: May 12, 2017 04:52 AM2017-05-12T04:52:23+5:302017-05-12T04:52:23+5:30
दौंड तालुक्यात अपुऱ्या ऊसपिकामुळे ऊस बेण्याचे दर चालू हंगामात कडाडले आहेत. प्रतिटन ४५00 इतका दर फुटल्याचे शेतकरीवर्गामधून सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राहू : दौंड तालुक्यात अपुऱ्या ऊसपिकामुळे ऊस बेण्याचे दर चालू हंगामात कडाडले आहेत. प्रतिटन ४५00 इतका दर फुटल्याचे शेतकरीवर्गामधून सांगितले जात आहे.
राहूबेट परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून ऊसपीक मोठ्या प्रमाणात घेत असतो. त्यामुळेच तालुक्यात चार साखर कारखाने आणि ३00 हून अधिक गुऱ्हाळाची संख्या आहे.
दरम्यान आगामी २०१७ ते २०१८ या वर्षाच्या ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीपूर्व तयारी पूर्ण केली आहे. शेतकरी रोहिणी नक्षत्रातील पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पहिला पाऊस झाला की, राहूबेट परिसरातील शेतकरी गूळ उत्पादनासाठी आडसाली उसाच्या लागवडी सुरु करतात. ही गेल्या पन्नास वर्षांपासूनचे ऊस लागवडीचे नियोजन आजही सुरू आहे. सध्या कोईमतूर, २६५, ८६०३२ या जातीच्या उसाच्या बेण्याची निवड शेतकरी करीत आहेत.
गेल्या हंगामात सन २०१६ ते २०१७ या हंगामात लागवड झालेल्या आडसाली उसापैकी बहुतेक ऊस हा गूळ उत्पादनासाठी आणि उर्वरित ऊस हा दौंड, बारामती, अहमदनगर यासह शेजारील तालुक्यातील रसवंती गृहांसाठी गेला आहे, तसेच जातही आहे. तसेच गेल्या हंगामातील लागवड झालेला ऊस या गुऱ्हाळ चालकांनी गाळप केला आहे.
चालू वर्षी लवकरच विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने व महावितरणच्या वाढत्या भारनियमनामुळे उसाची पिके हातची गेली आहेत. त्यात दौंड तालुक्यातून जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस पुणे, अहमदनगर या ठिकाणी जातो. बहुतांशी ठिकाणी उसाची पिके जळून गेल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ऊसपीक कमी झाल्याने याचा परिणाम आगामी आडसाली ऊस लागवडीवर होणार आहे. त्यामुळे साहजिकच ऊस बेण्याचे दर कडाडले आहेत.