गडकरी पुतळा सन्मानाने बसवा
By admin | Published: March 30, 2017 02:47 AM2017-03-30T02:47:38+5:302017-03-30T02:47:38+5:30
ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा एकदा सन्मानाने बसविला जावा, तसेच लवकरात
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा एकदा सन्मानाने बसविला जावा, तसेच लवकरात लवकर कलाकारांची बैठक बोलावून पुतळ्यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा, अशा मागणीचे पत्र अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे.
संभाजी उद्यानातून गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर कलाकारांमधून या घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुण्या-मुंबईतील कलाकारांनी एकत्र येऊन गडकरींचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पुतळा तयारही केला. परंतु, कायद्याने महापालिकेव्यतिरिक्त कोणत्याही संस्थेला पुतळा बसवण्याचा अधिकार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून कलाकारांच्या कार्यक्रमास संभाजी उद्यानात मज्जाव केला. त्याचवेळी पुतळा बसवण्यासंदर्भात पुणे महापालिकेत ठराव करण्यात आला.
पुणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने, पुतळ्यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांना पत्र देऊन त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कलाकारांनी केली आहे. कलाकारंनी तयार केलेला पुतळा महापालिकेने स्वीकारावा आणि तो संभाजी उद्यानात बसविण्यात यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
(प्रतिनिधी)
सर्वपक्षीय नगरसेवकांचा होता पाठिंबा
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्यावर पुणे महानगरपालिकेशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात महाजन म्हणाले, की महापालिकेमध्ये निवडणुकांपूर्वी पुतळा बसवण्यासंदर्भातील ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.
भाजपानेही पुतळ्यासंदर्भात आश्वासन दिले होते. पुण्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेव्हा आता लवकरात लवकर यासंदर्भात बैठका घेऊन गडकरी पुतळा बसवण्याच्यासंदर्भात पालिकेने कलाकारांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला पाहिजे.