कमकुवत पायामुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:55 AM2018-07-22T03:55:48+5:302018-07-22T03:55:57+5:30

अग्निशमन दलाकडून दहा जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, यातील काही जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

The primary form of building collapse is due to a weak foundation | कमकुवत पायामुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज

कमकुवत पायामुळे इमारत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज

googlenewsNext

मुंढवा : येथील केशवनगर संभाजी चौकातील ओढ्याच्या कडेला असलेली दुमजली इमारत शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबासह काही जण ढिगा-याखाली अडकले होते. अग्निशमन दलाकडून दहा जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, यातील काही जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीचा पाया कमकुवत झाल्याने ती कोसळली, असा प्राथमिक अंदाज आहे.
केशवनगर येथील संभाजी चौकात ओढ्याच्या कडेलाच सुभाष भंडलकर यांच्या मालकीची दोन मजली आरसीसी बांधकाम असलेली सुमारे २७ वर्षांपूर्वीची जुनी इमारत होती. आज सकाळी अकराच्या सुमारास ती कोसळली.
पोलीस व स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकराच्या सुमारास येथे मोठा आवाज आला. त्यामुळे आसपासचे नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. त्यावेळी ओढ्याशेजारी असलेली भांडवलकर यांची ही दुमजली इमारत जागेवरच कोसळली होती. यात इमारतीच्या खालच्या तळघरात गाई-म्हशींचा गोठाही होता. वरच्या मजल्यावर भांडवलकर व त्यावरील मजल्यावर भाडेकरू मौर्य राहत होते. इमारत कोसळल्यानंतर त्यातील जखमींना पोकलेन व जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. तळघरात असलेल्या जनावरांच्या अंगावर दोन्ही स्लॅब कोसळले. त्यामुळे सहा गाई-म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर कोसळलेल्या स्लॅबला भिंतीचा आधार मिळाल्याने काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या जागेत कुटुंबातील सदस्यही अडकले होते. त्यांच्या हात, पाय, कंबर आणि डोक्याला गंभीर इजा झाल्या आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
इमारत सुमारे २७ वर्षांपूर्वीची जुनी असून या इमारती शेजारून नैसर्गिक ओढा बारमाही पाण्याने वाहत आहे. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याने आणि ओढ्यातून वाहणाºया पाण्यामुळे ही इमारत जागेवरच कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सायंकाळी सातपर्यंत हे बचावकार्य सुरू होते. मुंढवा पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे.

अनेक बांधकामे धोकादायक स्थितीत...
मुंढव्याचा उर्वरित भाग म्हणून केशवनगर ग्रामपंचायत नुकतीच महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. सध्या येथील कारभार पालिका प्रशासनाकडून पाहिला जात आहे. असे असले तरी मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच येथे होणारी अनधिकृत बांधकामे तसेच जुन्या झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात पालिकेला अपयश आल्याचे आजच्या घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.

परिसरात नदीकडेला तसेच ओढ्याच्या कडेला, खाणीच्या बाजूला अनेक जुनी व नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांचे वेळीच परीक्षण केल्यास भविष्यात होणारी दुर्घटना टळेल. त्यामुळे पालिकेने या घटनेकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

जेव्हा ग्रामपंचायतीचा कारभार होता. त्यावेळी आम्ही अनधिकृत बांधकाम रोखत होतो. प्रसंगी कडक भाषेचा वापर करीत होतो. आज केशवनगरचा भाग महानगर पालिकेमध्ये वर्ग झाल्यामुळे या भागातील जमिनी व इमारतींना मोठ्या प्रमाणावर मागणी व किंमत निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करतात व केवळ नोटीस देऊन जातात. त्यामुळे या बांधकामावर कोणताही चाप राहिलेला नाही.
- डॉ. महादेव कोद्रे, सरपंच, केशवनगर ग्रामपंचायत

जुन्या इमारतीचा विषय या अगोदरच सभागृहात मांडून झाला आहे. या घटनेनंतर हा विषय येऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा प्रकर्षाने मांडण्यात येईल. जुन्या व धोकादायक इमारतींचे आॅडिट होऊन सक्तीनं अशा इमारती मोकळ्या करणं गरजेचे आहे. याबद्दल महापालिकेमध्ये हा विषय लावून धरण्यात येईल.
- योगेश ससाणे, नगरसेवक, प्रभाग क्र. २३, हडपसर गावठाण, सातववाडी

Web Title: The primary form of building collapse is due to a weak foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.