प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:30+5:302021-08-27T04:13:30+5:30
बारामती: शिक्षक बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार झाले असून, दिवाळीपूर्वी आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली पोर्टल सुरू होऊन दिवाळीत बदली प्रक्रिया ...
बारामती: शिक्षक बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार झाले असून, दिवाळीपूर्वी आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली पोर्टल सुरू होऊन दिवाळीत बदली प्रक्रिया होणार आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे, अशी माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.
कागल कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी सुधारित बदली धोरण जाहीर केले आहे. परंतु, बदली प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर तयार नसल्याने यावर्षी अद्याप बदल्या होऊ शकल्या नाहीत. तसेच, गेली दोन वर्षे बदल्या न झाल्याने शिक्षकात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बदली सॉफ्टवेअर तयार झाल्याने बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बदलीसाठी धरावयाच्या सेवेची अंतिम तारीख ३१ मेऐवजी ३० जून करावी. तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना रिक्त जागेवर विनंती बदलीची संधी मिळावी, याकरिता शुद्धिपत्रक काढावे अशी आग्रही मागणी करण्यात आली. शुद्धिपत्रकाचा विषय बदली धोरण समितीकडे सोपविला आहे. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.