पंतप्रधान मोदी यांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:57 PM2019-09-23T19:57:33+5:302019-09-23T20:19:35+5:30
भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले.
पुणे : नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर एक कोटी ४५ लाख कोटींची करसवलत जाहीर केली आहे. यामुळे हा पैसा अर्थचक्रात उपलब्ध होवून नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत. भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले.
पुण्यात आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय संघटनमंत्री व्हि.सतिश, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, यांच्यासह पुणे भाजपच्या अध्यक्ष माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, मूळचे पश्चिम पाकिस्तानातील असलेले इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग हे पंतप्रधान तर लालकृष्ण आडवाणी हे देशाचे उपपंतप्रधान बनू शकले, परंतू कलम ३७० मुळे जम्मू- कश्मिरमधील मुळच्या गुज्जर, बकरवाल समाजाला आरक्षणाअभावी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधीत्व करता येत नव्हते. हे कलम हटविल्याने आता जम्मू कश्मिरच्या विधानसभेत आणि संसदेत या समाजाचे प्रतिनिधी दिसतील. कश्मिरच्या महिलांना बाहेरील राज्यात लग्न केल्यानंतरही मालमत्तेत अधिकार मिळणार आहे. आतापर्यंत देशातील बहुतांश कायदे तेथे लागू होत नव्हते, ते यापुढे लागू होतील. तीन तलाक बील मंजूर केल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.पाच वर्षापुर्वी महाराष्ट्राचे राजकारण भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. घराणेशाही, सत्तेतून पैसा यामुळे भ्रष्टाचार बोकाळला होता. सरकार स्थिर नसल्याने राज्याची पिछेहाट झाली होती. परंतू फडणवीस यांच्या नेतृत्वाने शेती, शिक्षण, आरोग्य, परकिय गुंतवणुकीत राज्याला वरच्या स्थानावर आणले आहे.